चिपळूण (प्रतिनिधी) : सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज आंबडस या विद्यालयात नुकतीच महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रथम दीप प्रज्वलन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक महेश कुलकर्णी यांच्या हस्ते महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला तर विद्यालयातील शिक्षक मर्गज यांच्या हस्ते लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर इयत्ता नववी मधील कुमारी पूर्वा साळुंके हिने आपले विद्यार्थी मनोगत व्यक्त केले. शिक्षक राजेंद्र बाबांडे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी महात्मा गांधीजी यांच्या जीवनातील अनेक छोट्या छोट्या प्रसंगातून त्यांच्या अंगी असलेल्या विविध गुणांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक महेश कुलकर्णी यांनी महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्याची माहिती सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी शालेय परिसर व आंबडस बाजारपेठ या ठिकाणची परिसर स्वच्छता केली. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक महेश कुलकर्णी, इतर सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रज्ञा जठार व आभार प्रदर्शन संगीता चौगुले यांनी केले.












