खेड पोलिसांतर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘एकता दौड’ उत्साहात पार!

खेड (प्रतिनिधी) – भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने ‘राष्ट्रीय एकता दिवस’ (Rashtriya Ekta Diwas) निमित्त “एकता दौड” (Run for Unity) या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता खेड येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
देशाच्या एकता, अखंडता आणि सुरक्षेच्या भावनेला बळकटी देण्यासाठी तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या देशासाठी केलेल्या अद्वितीय कार्याचे स्मरण करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
‘एकता दौड’ उपक्रमाचा शुभारंभ खेड पोलीस ठाण्यातून करण्यात आला. या वेळी खेड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या हस्ते दौडीचा प्रारंभ झाला. या दौडीत पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी, स्थानिक मान्यवर नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
ही दौड खेड पोलीस ठाणे येथून सुरू होऊन शिवतर रोडमार्गे एकवीरा नगर येथे जाऊन पुन्हा खेड पोलीस ठाण्यात परत आली. कार्यक्रमादरम्यान सुरक्षेची काटेकोर व्यवस्था ठेवण्यात आली होती.
खेड पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते, ज्याला नागरिकांनी उत्साहाने प्रतिसाद दिला. देशातील ऐक्य, बंधुता आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणाऱ्या या ‘एकता दौड’मुळे खेड परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.