बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिकांमध्ये वाढत्या मानसिक ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आता मानसिक आरोग्याच्या संवर्धनाकडे गंभीरतेने लक्ष देत आहे. या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभाग लवकरच नागरिकांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी एक विशेष प्रकल्प राबविण्याच्या तयारीत आहे.
या संदर्भात आज मंत्रालयात “पॉवर ऑफ वर्ड्स अकॅडमी” या मानसिक आरोग्यावर कार्यरत संस्थेच्या प्रतिनिधींसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नागरिकांमध्ये विशेषतः तरुण वर्गासह सर्व वयोगटांमध्ये वाढत असलेल्या ताणतणावाच्या समस्या, त्यामागील कारणे आणि त्यावर उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीदरम्यान असे निरीक्षण नोंदविण्यात आले की, अनेकदा लोक स्वतःच्या भावना व्यक्त करत नाहीत, ज्यामुळे त्यांच्या मनातील तणाव वाढतो आणि तो पुढे मानसिक आजाराच्या रूपात दिसून येतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या भावनांना योग्य दिशा देत, त्यांचे मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी सामाजिक व शासकीय पातळीवर जनजागृती आणि प्रशिक्षण आवश्यक असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले.
आरोग्य व्यवस्थेतील आशा स्वयंसेविका हा सर्वात महत्त्वाचा घटक असल्याने पहिल्या टप्प्यात त्यांना या प्रकल्पाच्या माध्यमातून मानसिक आरोग्याविषयी प्रशिक्षण देण्याबाबतही चर्चेत ठोस विचारमंथन झाले. या माध्यमातून त्या जनतेपर्यंत योग्य मानसिक आरोग्य संदेश पोहोचवू शकतील, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या बैठकीस “पॉवर ऑफ वर्ड्स” संस्थेच्या स्टेफी बाऊ (Stefy Bau), देबोरा पंडित-सवाफ (Deborah Pandit-Sawaf), श्री. गुरु सावले, श्री. विनीत जैन (Anbennac Ventures), डॉ. मयूर दुबे, श्री. मनप्रीत तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत आदी मान्यवर उपस्थित होते. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या उपक्रमामुळे नागरिकांच्या मानसिक आरोग्याविषयीची जागरूकता वाढण्यास आणि समाजात सकारात्मकता निर्माण होण्यास मोठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Home महत्वाच्या बातम्या मानसिक आरोग्याच्या संवर्धनासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचा पुढाकार — ‘पॉवर ऑफ वर्ड्स’ संस्थेसोबत...











