दोडामार्ग l प्रतिनिधी :दोडामार्ग तालुक्यातील मांगेली फणसवाडी येथील १८ वर्षीय कॉलेज तरुणी कु. समीक्षा सुनील गवस हिने सोमवारी (दि. १०) सायंकाळी उशिरा राहत्या घरी छताच्या लोखंडी रॉडला साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. कॉलेजमधून घरी आल्यानंतर तिने इतके अचानक आणि टोकाचे पाऊल का उचलले, याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत.
समीक्षा गवस ही भेडशी न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये बारावीचे शिक्षण घेत होती. सोमवारी ती कॉलेजमध्ये उपस्थित होती. त्यानंतर ती घरी परतली होती
याबाबत पोलिसांकडून तपास सुरू
असून पोलिसांनी रात्री उशिरा मांगेली फणसवाडी येथे धाव घेऊन पाहणी केली. यासंदर्भात मृत समीक्षा हिचे काका उमेश रामा गवस यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात खबर (माहिती) दिली आहे. मंगळवारी सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
दोडामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनेचा आवश्यक पंचनामा करून काही संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवले आहेत. पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. समीक्षा गवस हिच्या आत्महत्येमागील नेमके कारण लवकरच उघड होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.












