वेंगुर्ले l दाजी नाईक :प्रतिवर्षी वन विभागाच्या सर्कल तसेच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात आयोजित केल्या जातात. या स्पर्धांमधून निवड झालेल्या उत्तम खेळाडूंना अखिल भारतीय वन क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळते. यावर्षी सायकलिंग प्रकारात सावंतवाडी वन विभागातील ब्रह्मकुमार पंडित भोजने (वनरक्षक – तुळस) यांनी राज्यातून निवड होऊन राष्ट्रीय पातळीवर थेट झेप घेतली.
अखिल भारतीय वन क्रीडा स्पर्धा यावर्षी डेहरादून येथे भव्यदिव्य आयोजनात पार पडल्या. देशभरातील वनदलातील उत्तमोत्तम खेळाडूंमध्ये तीव्र स्पर्धा असताना, ब्रह्मकुमार भोजने यांनी आपल्या दमदार कामगिरीचा ठसा उमटवत पुरुष खुल्या प्रकारात १ तास ८ मिनिटे ५७ सेकंद अशी विलक्षण वेळ नोंदवत राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला. त्यांच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्र वनविभागाने राष्ट्रीय स्तरावर मोठी बाजी मारली आहे. श्री मिलिश दत्त शर्मा, उपवनसंरक्षक, सावंतवाडी वनविभाग, डॉ. सुनील लाड, सहायक वन संरक्षक, श्री संदीप कुंभार, वनक्षेत्रपाल कुडाळ यांचे भोजने यांना मार्गदर्शन लाभले. वन विभाग, सिंधुदुर्ग तसेच अधिकारी, सहकारी कर्मचारी, क्रीडा प्रेमी, ग्रामस्थ यांच्याकडून भोजने यांचे अभिनंदन होत आहे.











