खेड (प्रतिनिधी) – ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड-रत्नागिरी संचलित ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE), मोरवंडे–बोरज येथे दिनांक २२ नोव्हेंबर २०२५ रोजी शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले. विज्ञान, तंत्रज्ञान आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळालेल्या या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कविता विनोद सराफ हायस्कूल, लोटे येथील मुख्याध्यापक माननीय श्री. विजयकुमार बसवंत उपस्थित होते. तसेच संस्थेचे सरचिटणीस माननीय श्री. माधव पेठे हेही उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले. हे प्रदर्शन तीन गटांमध्ये विभागून घेण्यात आले होते. इयत्ता पहिली ते चौथी, पाचवी ते नववी आणि अकरावीच्या विशेष गटात विद्यार्थ्यांनी विज्ञान व तंत्रज्ञान विषयावर आधारित नावीन्यपूर्ण मॉडेल्स सादर केली. विविध संकल्पनांवर आधारित तयार केलेल्या या मॉडेल्समधून विद्यार्थ्यांची कल्पकता, विचारशैली आणि प्रयोगशीलता स्पष्ट जाणवत होती.
इयत्ता पहिली ते चौथी गटामध्ये चौथी ‘अ’ मधील विद्यार्थ्यांनी ‘वॉटर फिल्टर’ या मॉडेलसाठी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक ‘ग्रीन एनर्जी’ या विषयावर आधारित मॉडेलसाठी चौथी ‘अ’ मधील विद्यार्थ्यांना मिळाला. तर तृतीय क्रमांक ‘थ्रीडी होलोग्राम’ या अभिनव संकल्पनेवर तिसरी ‘बी’ मधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मॉडेलला प्रदान करण्यात आला.
पाचवी ते नववी गटामध्ये सातवीतील जिज्ञासू विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘मॅजिकल मॅथ्स’ या मॉडेलला प्रथम क्रमांक मिळाला. नववी ‘बी’ च्या विद्यार्थ्यांनी ‘वेस्ट मॅनेजमेंट’ या विषयावर केलेल्या कामासाठी द्वितीय क्रमांक तर आठवी ‘अ’ मधील विद्यार्थ्यांनी ‘स्मार्ट इरिगेशन’ या तंत्रज्ञानाधारित मॉडेलसाठी तृतीय स्थान मिळवले. अकरावीच्या विशेष गटामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेले विज्ञानप्रयोग विशेष लक्षवेधी ठरले. ‘एसी वॉटर कुलर’ या अभिनव प्रकल्पासाठी अकरावी JEE गटातील विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक मिळाला. द्वितीय क्रमांक ‘स्मार्ट हँडवॉश’ या मॉडेलला देण्यात आला, तसेच ‘वॉटर कन्सर्वेशन अॅण्ड मॅनेजमेंट’ या पर्यावरणपूरक संकल्पनेसाठी अकरावी NEET गटाने द्वितीय क्रमांक पटकावला. या विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षण करण्यासाठी पद्मश्री अण्णासाहेब बेहरे ज्युनिअर कॉलेज, लवेल येथील प्राध्यापक श्री. मंगेश शेटे, श्रीम. प्रिया चव्हाण व श्वेता गावडे (समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल, वेरळ), तसेच ज्ञानदीप विद्यामंदिर, भडगाव येथील श्री. माने सर, श्री. शिंदे सर आणि श्रीमती लेले मॅडम यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सदर विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्राचार्य श्री. भरत मोरे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष श्री. अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमण तलाठी, सरचिटणीस श्री. माधव पेठे, खजिनदार श्री. विनोद बेंडखळे, विश्वस्त श्री. पेराज जोयसर, जनसंपर्क अधिकारी श्री. दीपक लड्डा, संस्थापक सरचिटणीस श्री. प्रकाश गुजराती, श्री. भालचंद्र कांबळे, चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे तसेच सल्लागार मंडळ व प्रशालेचे सर्व शिक्षकवर्ग यांनी केले.








