दहा मतदान केंद्रावर ६० कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाकडून जनजागृती मोहिम
तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास गंबरे यांची माहिती
राजापूर : येथील नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेबाबत प्रशासकिय यंत्रणेकडून तयारी हाती घेण्यात आली आहे. तर मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जनजागृती मोहिमही राबविली जात असल्याची माहिती राजापूर तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास गंबरे यांनी दिली आहे. शहरातील दहा प्रभागांतील दहा मतदान केंद्रावर प्रत्येक मतदान केंद्रावर सहा या प्रमाणे ६० कर्मचारी नियुक्त केले जाणार असल्याचे गंबरे यांनी सांगितले. तर आवश्यक त्या त्या ठिकाणी पोलीस कर्मचारीही नियुक्त केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राजापुरात गोखले कन्या शाळा व विश्वनाथ विद्यालय या दोन मतदान केंद्रावर एक पिंक मतदान केंद्र (सर्व महिला कर्मचारी असलेले) व एक आदर्श मतदान केंद्र (आकर्षक सजावट असलेले) अशी दोन विशेष मतदान केंद्र असणार आहेत असेही गंबरे यांनी सांगितले.
राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी एक लोकनियुक्त नगराध्यक्ष व दहा प्रभागांतील २० नगरसेवक पदासाठी मंगळवारी २ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. यासाठी शहरातील दहा प्रभागात दहा मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहे.
राजापूर शहरातील दहा प्रभागांमध्ये ही दहा मतदान केंद्र असणार असून या प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन निवडणूक मतदान कर्मचारी, एक पोलीस कर्मचारी व एक शिपाई असे एकूण सहा कर्मचारी असणार आहेत. तर काही ठिकाणी राखीव कर्मचारीही असणार आहेत. तसेच आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे.
मतदान जनजागृती करणार
नगर परिषद निवडणूकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाच्या वतीने जनजागृती केली जात आहे. यापुर्वी पथनाटय सादर करण्यात आले होते. आता गुरूवारी राजापूर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय राजापूर व नवजीवन हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय राजापूरचे विद्यार्थी शहरात प्रभात फेरी काढून मतदानाबाबत जनजागृती करणार आहेत. तर पथनाटयाद्वारेही जनजागृती केली जाणार असल्याचे गंबरे यांनी सांगितले.













