डायलिसिस सेंटर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात सुरू: रुग्णांना मोठा दिलासा!

​पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्य; हेल्पलाईन ग्रुपच्या प्रयत्नांना यश

​दोडामार्ग: दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने आणि दोडामार्ग तालुका हेल्पलाईन ग्रुपच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात मोफत डायलिसिस सेंटर सुरू झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील डायलिसिस रुग्णांना आता उपचारासाठी दूरवर जाण्याची गरज राहणार नाही.

​या सेवेचा प्रथम लाभ तालुक्यातील रुग्णांना देण्यात येणार आहे.

​हेल्पलाईन ग्रुपचे पदाधिकारी यांनी रुग्णालयात भेट देऊन डायलिसिस कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर प्रशांत जाधव आणि नेफरॉलॉजिस्ट डॉ. प्रकाश घोगळे यांच्यासोबत चर्चा केली व त्यांना शुभेच्छा दिल्या.

​डायलिसिस सिंधुदुर्ग प्रमुख प्रशांत जाधव आणि दोडामार्ग प्रमुख वेनिशा फर्नांडिस यावेळी उपस्थित होते. वेनिशा फर्नांडिस यांनी माहिती दिली की, विद्युत पुरवठा खंडित होण्याची शक्यता असल्याने सोमवारी ही सेवा बंद राहील, मात्र मंगळवार ते रविवार नियमित सेवा उपलब्ध असेल.

​ डायलिसिससंबंधी अधिक माहितीसाठी रुग्णांनी किंवा नातेवाईकांनी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील “आरोग्य मित्र” यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन युथ हेल्पलाइनचे पदाधिकारी यांनी केले आहे.

​ही अत्यावश्यक सेवा सुरू झाल्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील अनेक रुग्णांना आरोग्यदायी नवी आशा मिळाली आहे.