गिर्ये येथील बौद्ध विहारात महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचे दर्शन घेता येणार

तालुक्यातील बुद्ध विहारात सहा डिसेंबर रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी त्यांचे अस्थी कलश दर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. महामानवाच्या अस्थी कलशाचे दर्शन घेण्यासाठी मौजे गिर्ये बौद्धजन विकास मंडळाच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना राज्याचे माजी मंत्री विजय (भाई) गिरकर यांनी सांगितले कि, पुज्य भदंत प्रा. सुमेधबोधी महास्थवीर-अध्यक्ष महाबोधी बहुउद्देशीय संस्था, वटफफळी ता. नेर जि. यवतमाळ यांनी १५ मे २०१० रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थी देवगड तालुक्यातील गिर्ये गावातील बुद्ध विहारात ठेवण्यासाठी दिलेल्या होत्या. आमच्या मौजे गिर्ये बौद्धजन विकास मंडळाच्या वतीने या पवित्र अस्थी गेली १५ वर्षे व्यवस्थित जतन करुन ठेवण्यात आल्या आहेत. आमच्या बुद्ध विहाराचा गेल्यावर्षी जिर्णोद्धार सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. त्यावेळी आकर्षक कलशामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी ठेवण्यात आलेल्या आहेत. महापरिनिर्वाण दिनी लाखो लोक मुंबई येथील चैत्यभूमीवर दर्शनासाठी जातात. ज्यांना मुंबईत जाणे शक्य होत नाही त्यांना गिर्ये येथील बुद्ध विहारात अस्थी कलशाचे दर्शन घेता येणार आहे. यानिमित्ताने मौजे गिर्ये बौद्धजन विकास मंडळ व पंचशील महिला मंडळाच्या वतीने दर्शनासाठी येणाऱ्या अनुयायांना दर्शन चोख मिळण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थीकलशाचे दर्शन सर्वांनी गिर्ये येथे उपस्थित राहून घ्यावे असे आवाहन करीत असल्याचे भाई गिरकर यांनी केले आहे.