गोळवशी येथे पार पडला लक्ष कृषी महोत्सव

दि प्राइड इंडिया व एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम

लांजा:  ग्रामीण भागातील गोरगरीब लोकांच्या हाताला काम धंदा मिळवून त्यांना खऱ्या अर्थाने आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणे आणि गावागावांचा विकास करणे हे स्वप्न माझ्या आईने पाहिले होते आणि आता ते स्वप्न सत्यात उतरत आहे ही नक्कीच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असल्याचे प्रतिपादन एचडीएफसी बँकेच्या वरिष्ठ अधिकारी श्रीमती मनीषा यांनी गोळवशी येथे केले.
दि प्राइड इंडिया व एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रुरल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट अंतर्गत लक्ष कृषी महोत्सव २०२५ बुधवारी गोळवशी येथे पार पडला. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती मनीषा या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की आपल्या आईने पाहिलेले स्वप्न आज वास्तवात उतरत आहे. दि प्राइड इंडिया आणि एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील, राज्यातील ग्रामीण भाग खऱ्या अर्थाने विकसित करण्याचे ग्रामीण भाग खऱ्या अर्थाने विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे. येथील गोरगरीब जनतेच्या हाताला काम मिळवून देण्याबरोबरच हे गाव आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण आणि प्रगत करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे आणि याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ही नक्कीच आनंदाची आणि कौतुकाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या कार्यक्रमा प्रसंगी व्यासपीठावर एचडीएफसी बँकेच्या वरिष्ठ अधिकारी श्रीमती मनीषा यांच्यासह जिल्हा कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक योगेश पगारे त्याचप्रमाणे दि प्राईड इंडियाच्या मानद संचालिका श्रीमती इशा मेहरा, तालुका कृषी अधिकारी अभिजीत शेलार तसेच कृषी अधिकारी पंचायत समिती संतोष म्हेत्रे, कृषी विज्ञान केंद्र लांजा चे विषय विशेषतज्ञ डॉ. एस एस चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे डीप्राईड इंडियाचे कोकण विभाग प्रमुख डॉक्टर वीरेंद्र कुलकर्णी, हेड फायनान्स सचिन खोत आणि प्राइड इंडियाची टीम यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लीला घडशी यांनी केले.‌ यावेळी बोलताना दि प्राइड इंडियाच्या मानद संचालिका श्रीमती इशा मेहरा म्हणाल्या की, दि प्राइड इंडिया आणि एचडीएफसी बँक हे दोघेजण हातात हात घालून ग्रामीण भागाचा विकास करण्याच्या दृष्टीने कामाला लागले आहेत आणि त्यांना गावागावातील जनतेचा उदंड असा प्रतिसाद लाभत आहे.‌ ही नक्कीच स्वागतार्ह बाब असून इवलेसे रोप लावलीये द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी अशाप्रकारे दिवसेंदिवस संस्थेची प्रगती होत आहे असे त्या म्हणाल्या. यावेळी व्यासपीठावर उपस्थित अन्य मान्यवरांची देखील मार्गदर्शनपर मनोगते झाली .
या कार्यक्रमाला गोळवशी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.