पंचक्रोशी ग्रामविकास समितीच्या सातत्यपूर्ण मागणीला यश – प्रशासकीय समिती प्रमुख आदिनाथ कपाळे यांची माहिती
राजापूर (वार्ताहर): कोकण रेल्वे मार्गावरील राजापूर रोड येथे प्रवासी लिफ्ट मंजूर करण्यात आली आहे. त्यासाठी ६० लाखाची निविदा जाहिर करण्यात आल्याची माहिती या कामी पाठपुरावा करणारे पंचक्रोशी ग्रामविकास समितीचे प्रशासकीय समिती प्रमुख आदिनाथ कपाळे यांनी दिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पंचक्रोशी ग्रामविकास समितीच्या माध्यमातून राजापूर रोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी लिफ्टची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी सातत्याने मागणी करण्यात येत होती. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवासी तसेच आजारी व्यक्तींना वर–खाली येताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे ही मागणी अत्यंत आवश्यक व प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण होती.
सदर मागणीचा सकारात्मक विचार करून मागणी मान्य करत आज लिफ्टसाठीची ६० लाखाची निविदा अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्याची माहिती प्रशासकीय समिती प्रमुख आदिनाथ कपाळे यांनी दिली. हा निर्णय प्रवाशांच्या सोयीसाठी अत्यंत दिलासादायक असून सामाजिक जाणिवेचे उत्तम उदाहरण आहे.
या महत्त्वपूर्ण मागणी मान्य व्हावी याकरिता पंचक्रोशी ग्रामविकास समितीचे माजी अध्यक्ष अनिल भोवड, नूतन अध्यक्ष विश्वास राघव, सचिव संदेश मिठारी, समितीचे प्रशासकीय समिती प्रमुख आदिनाथ कपाळे, कार्याध्यक्ष संतोष जोगळे, खजिनदार अनिल राऊत व इतर पदाधिकारी यांनी प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला होता. ही मागणी मान्य केल्याबद्दल कोकण रेल्वे प्रशासनाचे पंचक्रोशी ग्रामविकास समिती, राजापूर (मुंबई) यांनी आभार मानले आहेत.












