रत्नागिरीत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पोलीस सज्ज; पर्यटकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन

​​रत्नागिरी: आगामी २०२६ या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारे आणि पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता, रत्नागिरी पोलीस दलाने कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याभरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.
​उत्सवाच्या काळात हुल्लडबाजी आणि अनुचित प्रकार रोखण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष गस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत. विशेषतः मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्यांवर आणि छेडछाडीच्या (Eve-Teasing) घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी साध्या वेशातील पोलीस पथके नजर ठेवणार आहेत. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार असून, ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात ‘ब्रीथ अनालायझर’द्वारे तपासणी करून कायदेशीर कारवाई केली जाईल. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमांच्या ठिकाणी व्हिडिओग्राफी पथकांद्वारे २४ तास लक्ष ठेवले जाणार आहे.
​महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र महिला पथके कार्यरत असून, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवर सायबर पोलीस ठाणे बारीक लक्ष ठेवून आहे. रत्नागिरी पोलीस दलाने आवाहन केले आहे की, पर्यटकांनी गड-किल्ले, समुद्रकिनारे आणि मंदिरांचे पावित्र्य राखावे, वाहतूक नियमांचे पालन करावे आणि कोणत्याही मदतीसाठी तात्काळ ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा.