डॉ. दिनेश नागवेकर यांना दिल्लीत राष्ट्रीय ‘राजदूत पुरस्कार’ प्रदान

सावंतवाडी : दिल्लीतील न्यु थिंक फाऊंडेशनतर्फे आयोजित राष्ट्रीय परिषदेत डॉ. दिनेश नागवेकर यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘राजदूत पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. भारतातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २० मान्यवरांमध्ये डॉ. नागवेकर यांची निवड करण्यात आली होती.

आयुष मंत्रालयाचे माजी सदस्य संचालक डॉ. दिनेश उपाध्याय आणि उत्तराखंडचे माजी कॅबिनेट राज्यमंत्री श्री. कमल सिंग नेगी यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. उपाध्याय म्हणाले की, पुरस्कार हे कार्याचे प्रोत्साहन असून समाजात ज्ञान आणि संस्कारांची सांगड घालणाऱ्या व्यक्तींची आज गरज आहे.

डॉ. दिनेश नागवेकर हे गेल्या ४५ वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी अनेक शैक्षणिक संस्थांच्या इमारतींसाठी विनामूल्य मार्गदर्शन केले आहे. ते सावंतवाडीतील शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. राणी पार्वतीदेवी हायस्कूल, दोडामार्ग, चौकूळ, उर्दू हायस्कूल यांसह अनेक शाळांच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे.

यापूर्वी त्यांना ‘आयडॉल ऑफ महाराष्ट्र’ यासह १४ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. न्यु थिंक फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती अनिता देवी व जनरल सेक्रेटरी विकास शर्मा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम दिल्ली येथे पार पडला.