नरेंद्र मोहिते, राजापूर :
राजापूर तालुक्यात गेल्या काही वर्षात ग्रामीण भागासह शहरातही बिबटयांचा मुक्त संचार वाढलेला पहावयास मिळत आहे. मात्र जंगलात मुक्तपणे वारवरणारा हा प्राणी आता मानवी वस्तीकडे का वळू लागला याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. राजापूर तालुक्यातील २४८ गावांमध्ये सुमारे ३५० ते ४०० इतक्या बिबटयांचे वास्तव्य असल्याचा वनविभागाचा कयास असून भविष्यात या बिबटयांच्या संवर्धनासाठी व त्यांना मानवी वस्तीपासून दूर ठेवण्यासाठी वनविभाग, प्राणीप्रेमी आणि जनता यांच्या सहयोगातुन सामूहिक प्रयत्न होणे आवश्यक आहे. राजापुर तालुक्यात ब्लॅक पँथरचे अस्तीत्व असल्याचेही यापुर्वीच अधोरेखीत झाले असून गेल्या काही वर्षात वन विभाग व राजापूर वासीयांनी ३० ते ३५ बिबटयांना जीवदानही दिले आहे. मात्र बिबटयांचा मानवी वस्तीकडील संचार रोखण्यासाठी वनसंरक्षणाबरोबरच ठोस उपाययोजनांची गरज असून तसे झाल्यास भविष्यात निसर्गाचा समतोल राखणे शक्य होणार आहे.
जंगलामध्ये बिबटयांना भक्ष्य मिळत नसल्याने आज ते मानवी वस्तीकडे वळू लागले असून निसर्गाचा समतोल राखायचा असेल तर भविष्यात जंगलतोड रोखतानाच अन्य वन्य प्राण्याच्या संरक्षणाबरोबरच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रभावी उपायोजनांची गरज आहे. त्यासाठी शासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असून तसे न झाल्यास वाढणारी बिबटयांची संख्या भविष्यात मानवी हानीला कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राजापूर तालुक्यामध्ये बिबट्याचा वावर असून अनेक ठिकाणी बिबट्या आढळून आला आहे. खास करून तालुक्याच्या दक्षिणेकडील भागातील भालावली, भू, पेंडखळे, दसूर यांसारख्या गावांमध्ये ही संख्या अधिक आहे. सुमारे पंधरा वर्षापूर्वी ओणी येथे विहीरीमध्ये पडलेला ब्लॅक पँथर आढळलेला असताना गतवर्षी कुवेशी येथे फासकीमध्ये ब्लॅक पॅथर अडकल्याची घटना घडली होती. या दोन्ही ठिकाणी वनविभागाला ब्लॅक पँथरची सुखरूपपणे सुटका करण्यात यश आले आहे. मात्र, त्यामुळे राजापूरमध्ये ब्लँक पँथरचे वास्तव्य असल्याचे अधोरेखित झाले आहे. राजापूर नजीकच्या सिंधुदूर्ग जिह्यामध्ये पट्टेरी वाघाचे वास्तव्य अधोरेखित झाले असून वन्यजीव संस्थान (डब्ल्यू.आय.आय.) संस्थेने कर्नाटक, गोवा आणि सिंधुदूर्ग असा वाघाचा कॉरीडॉर असलेल्या भागामध्ये केलेल्या सर्व्हेक्षणात सुमारे ५० पट्टेरी वाघांचे वास्तव्य असल्याचे आढळून आले होते. मात्र, रत्नागिरी जिल्ह्याच्या विशेषतः राजापूर-लांजा-रत्नागिरी तालुक्यातील सह्याद्री घाटाच्या पायथ्यासह समुद्र किनारपट्टीनजीकचा दाट जंगलाच्या भागामध्ये पट्टेरी वाघाचे वास्तव्य असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी भविष्यात योग्य पध्दतीनें संशोधन होणे गरजेचे आहे.
तालुक्यामध्ये गेल्या तीन ते चार वर्षामध्ये विहीरीमध्ये पडणे वा फासकीत अडकणे यामध्ये सुमारे अकरा जीवंत बिबट्या सापडले आहेत. जंगलरक्षणाचा वसा हाती घेतलेल्या वनविभागाने स्वतःच्या प्रयत्नांना जनसंपर्काची साथ घेत विहीरमध्ये पडलेले वा फासकीत अडकलेल्या या बिबट्यांची सुखरूपणे सुटका केली आहे. एवढेच नव्हे तर, सुटका केलेल्या या बिबट्यांना मुक्तपणे जगता यावे यासाठी त्यांना नैसर्गिक अधिवासामध्येही सोडले. बिबट्यांच्या संवर्धनाच्यादृष्टीने निश्चितच ही आनंददायी बाब आहे. मात्र काही ठिकाणी बिबटयांचा मृत्युही झाला आहे. वन विभाग व प्राणीमित्रांसाठी ही चटका लावणारी बाब ठरत आहे.
गेली काही वर्षे शहरासह ग्रामीण भागात लोकवस्तीमध्ये बिबट्याचा वावर वाढलेला मुक्त संचार चिंतेची बाब ठरत आहे. मोठया प्रमाणावर होणाऱ्या जंगलतोडीमुळे जंगलपरिसर आणि डोंगर उघडे-बोडके होवू लागले आहेत. यामुळे बिबट्यासह अन्य वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवासाला बाधा येवून त्यांचा मानवीवस्तीतील वावर वाढला आहे. त्याच्यातून मानव आणि बिबट्या-वन्यप्राणी यांच्यामध्ये संघर्ष वाढताना बिबट्यांकडून मानवावर हल्ले होवू लागले आहेत. तर गुरे, शेळयांसह पाळीव कुत्र्यांची बिबट्याकडून शिकार करण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबतही भविष्यात गांभीर्याने विचार होण्याची आवश्यकता असून जंगलातील हा प्राणी आता मानवी वस्तीत का येतोय याचा मानवाने आणि वनविभागानेही गांभीर्याने विचार करायाला हवा. अन्यथा भविष्यात हा संघर्ष अधिक तीव्र होऊन बिबटयांकडून मानवी हल्ल्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
वन्यजीव संरक्षणांच्या कामांकरीता, वन्यप्राण्यांचे प्राणघातक हल्ला होऊ नये आणि झालाच तर त्याच्या उपाययोजनाकरीता वनविभागाकडे उपलब्ध असलेल्या असलेल्या सोयीसुविधा, यंत्रसामुग्री अन् कर्मचारी वर्ग अपुरा पडत आहे. त्यामुळे पश्चिमेच्या समुद्र किनाऱ्यापासून थेट सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंत विस्तारलेल्या राजापूर परिमंडळामध्ये पंचायत समिती गणनिहाय एक याप्रमाणे बारा वनमजूर मंजूरीचा प्रस्ताव शासनाकडे आहे. त्याला मंजूरी मिळणे आवश्यक आहे. तर वनविभागाला आवश्यक ती अत्याधुनिक साधनसामुग्री पुरविताना जंगल व जंगलातील वन्य जीवांचे संरक्षण याबाबत अधिकाधिक जनजागृती व प्रभावी उपाययोजनांसाठी नियोजन आवश्यक आहे. जेणेकरून निसर्गाचा समतोल राखला जाईल व बिबटयासह अन्य वन्य प्राण्यांचेही संरक्षण होईल. मात्र यासाठी वनविभाग, प्राणीप्रेमी, लोकप्रतिनिधी आणि तालुका वासीयांचा सक्रिय सहभाग व योगदानाचीही आवश्यकता आहे.
पश्चिम घाटातील जैवविविधततेचा वारसा लाभलेल्या राजापूर तालुक्यामध्ये अनेक दुर्मिळ अशा वन्यजीवांचे वास्तव्य असल्याचे सातत्याने अधोरेखित झाले आहे. या वन्यजीवांसह वनसंपदेचे संरक्षण आणि संवर्धन करणे गरजेचे आहे. त्याची सर्वाधिक जबाबदारी वनविभागाची असते. मात्र, त्यासाठी अत्यावश्यक असलेल्या सोयीसुविधा वनविभागाकडे नसल्याने वनविभागाच्याही मर्याद स्पष्ट होत आहेत.
वन्यजीव हे मानवाचे दुश्मन नाहीत. मात्र, बेसुमार वृक्षतोड आणि जंगलात त्यांच्या भक्षाची कमतरता यामुळे बिबट्याचा मानवी वस्तीकडे वावर वाढला आहे. मानवाला सुसह्यपणे जगण्यासाठी आणि निसर्गातील अन्नसाखळीत कायम राहण्यासाठी वनासह वन्यजीव याचं संवर्धन करणे काळाची गरज आहे. वन विभागातील कर्मचार्यांची संख्या वाढवून वन्यजीवाबाबत समाज प्रबोधन करणे हे काळाची गरज आहे असे प्राणीमित्रांचे म्हणने आहे.
त्यामुळे भविष्यात बिबटयांचे संरक्षण व संवर्धन करताना त्यांचा मनावी वस्तीकडे वाढलेला वावर व मुक्त संचार रोखण्यासाठी वनविभाग आणि राजापूरकर यांच्या सामूहिक प्रयत्नांचीच गरज आहे एवढे मात्र नक्की.












