कर्ले महाविद्यालयाच्या अक्षता मोंडकर यांना ‘आधुनिक सावित्री २०२६’ पुरस्कार

शिक्षण व समाजकार्यातील उल्लेखनीय कार्याची दखल

शिरगाव (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत देण्यात येणारा ‘आधुनिक सावित्री पुरस्कार २०२६’ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालय, शिरगाव येथील प्राध्यापिका अक्षता हरिश्चंद्र मोंडकर यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार ३ जानेवारी रोजी बारामती येथे प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि शारदाबाई पवार महाविद्यालय, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर संसदेचे तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन ३ ते ७ जानेवारी दरम्यान बारामती येथे सुरू आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वसा व वारसा पुढे नेत, शिक्षण, समाज, उद्योजकता व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या राज्यातील १९ महिलांना ‘आधुनिक सावित्री २०२६’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्राध्यापिका अक्षता मोंडकर यांचा समावेश होता.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंटचे अध्यक्ष राजेंद्र पवार, यशदाचे उपमहासंचालक डॉ. शेखर गायकवाड, इंडियन रेल्वे पर्सोनल सर्व्हिसचे तुषाबा शिंदे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. देविदास वायदंडे, डॉ. नितीन घोरपडे, माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, शारदाबाई पवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकुमार महामुनी, राज्यस्तरीय करिअर संसदेचे अध्यक्ष डॉ. धनंजय तळवणकर, सचिव डॉ. एस. डी. देशभ्रतार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्राध्यापिका अक्षता मोंडकर यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थाध्यक्ष अरुण कर्ले, सर्व संचालक व पदाधिकारी, महाविद्यालयाचे चेअरमन संभाजी साटम तसेच प्राचार्य समीर तारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

फोटो कॅप्शन:बारामती येथे आयोजित कार्यक्रमात कर्ले महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अक्षता मोंडकर यांना ‘आधुनिक सावित्री २०२६’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.