पत्रकार राजेश कळंबटे यांची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून निवड
रोहा : पश्चिम बंगाल मधील बन्सबेरिया (जि. होगळी) येथे २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या ४१ व्या राष्ट्रीय कुमार-मुली खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कुमार गटच्या कर्णधारपदी किरण वसावे तर मुली गटाच्या कर्णधारपदी अश्विनी शिंदे यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र मुली संघात रत्नागिरीची पायल पवार हिचा समावेश असून राजेश कळंबटे सहायक प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. रोहा येथे झालेल्या राज्य निवड चाचणी स्पर्धेतून दोन्ही संघांची निवड झाल्याचे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव ऍड. गोविंद शर्मा यांनी जाहीर केले. या संघांचे सराव शिबीर रोहा येथेच १४ डिसेंबरपासून सुरु होते.
प्रशिक्षक सोमनाथ बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुमार गटाचा सराव सुरु होता तर श्रीकांत गायकवाड आणि सहायक प्रशिक्षक राजेश कळंबटे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींचा सराव सुरु होता. या प्रसंगी संघांचे फिजिओ डॉ. अमित रावटे यांनी खेळाडूंना आरोग्य विषयक मार्गदर्शन करतानाच फिटनेसचे महत्व पटवून दिले. या शिबिराचा समारोप महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष विजयराव मोरे, रोहा तालुका असोसिएशन अध्यक्ष विनोदभावू पाशिलकर, विशाल शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये झाला. श्री. मोरे यांनी दोन्ही संघाना अव्वल कामगिरी करा अशा शुभेच्छा दिल्या. तसेच दोन्ही संघांचे कर्णधार जाहीर करण्यात आले. दोन्ही संघ स्पर्धेसाठी पश्चिम बंगालला रवाना होणार आहेत. या संघाना खो-खो फेडरेशनचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, सचिव अॅड. गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अॅड. अरुण देशमुख, माजी सचिव संदीप तावडे यांच्यासह राज्य खो-खो असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी शुभेच्छा दिल्या.
कुमार संघ: किरण वसावे (कर्णधार, उस्मानाबाद), रुपेश कोंढाळकर, सुरज झोरे, वैभव मोरे, साहिल खोपडे (सर्व ठाणे), चेतन बिका, विवेक ब्राम्हणे (सर्व पुणे), सचिन पवार, रवी वसावे (सर्व उस्मानाबाद), शिवम बमनाळे (अहमदनगर), गणेश बोरकर (सोलापूर), विशाल खाके (मुंबई), निखिल सोङये (मुंबई उपनगर), मोमीन उजर (सांगली), यश चोगुले (रायगड). प्रशिक्षक : सोमनाथ बनसोडे, फिजिओ : डॉ. अमित रावटे, व्यवस्थापक : विशाल शिंदे.
मुली संघ : अश्विनी शिंदे (कर्णधार), संपदा मोरे, प्रणाली काळे, आदिती गवळी, तन्वी भोसले (सर्व उस्मानाबाद), दीदी ठाकरे , सोनाली पवार, वृषाली भोये (सर्व नाशिक), कल्याणी कंक, काजल शेख (सर्व ठाणे), सानिका निकम, सानिका चाफे (सर्व सांगली), दीपाली राठोड (पुणे), प्रीती काळे सोलापूर), पायल पवार (रत्नागिरी). प्रशिक्षक : श्रीकांत गायकवाड, सहाय्यक प्रशिक्षक : राजेश कळंबटे, व्यवस्थापिका : सौ. अमिता गायकवाड.