देवगड प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड सागरी हद्दीत अनधिकृत LED मासेमारीविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने धडक कारवाई केली. दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.३० वाजता विजयदुर्गसमोरील सागरी क्षेत्रात LED लाइटचा वापर करून मासेमारी करणारी रत्नागिरी जिल्ह्यातील नौका ताब्यात घेण्यात आली.
देवगड परवाना अधिकारी तथा अंमलबजावणी अधिकारी श्री. किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील गस्ती पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. अंदाजे १८ ते २० वावा खोलीत आणि सुमारे १० सागरी मैल अंतरावर संबंधित नौका दुसऱ्या पर्ससीन मासेमारी नौकेस LED लाइटद्वारे सहाय्य करत असल्याचे निदर्शनास आले. गस्ती पथक जवळ येताच संशयित नौकेने पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र सतर्कतेने पाठलाग करून काही मिनिटांतच तिला ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईदरम्यान नौका जप्त करण्यात आली असून तिच्यावरून LED लाइट साहित्य आणि जनरेटर पंचनामा करून जप्त करण्यात आले. ही कारवाई महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ तसेच सुधारित अधिनियम २०२१ अंतर्गत करण्यात आली आहे. या हंगामातील LED मासेमारीविरोधातील ही पहिली मोठी कारवाई मानली जात आहे.
जप्त नौकेचे नाव अल आदम असून तिचा नोंदणी क्रमांक IND-MH-4-MM-1146 असा आहे. या नौकेचे मालक आबिदीन जमालोद्दीन फणसोपकार, साखरीनाटे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी असे आहेत. नौकेवर तांडेल आणि दोन खलाशी उपस्थित होते. त्यांना ताब्यात घेऊन नौका देवगड बंदरात सुरक्षित आणण्यात आली आहे.
या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग श्री. सागर कुवेसकर यांच्याकडे सादर करण्यात येणार असून सुनावणीनंतर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या मोहिमेत सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व रक्षक श्री. टुकरुल, श्री. खवले, श्री. फाटक, श्री. बांधकर आणि श्री. नेसवंनकर यांचे सहकार्य लाभले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. नितेश राणे यांच्या दिशानिर्देशानुसार अवैध मासेमारीविरोधातील कारवाया अधिक तीव्र करण्यात आल्या आहेत.
स्थानिक मच्छीमारांनी या कारवाईचे स्वागत केले असून LED मासेमारीमुळे पारंपरिक मासेमारीला धोका निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली. विभागाने भविष्यातही अशा मोहिमा अधिक कडकपणे राबवण्याचे संकेत दिले आहेत.












