वार्तापत्र -कोकण संतोष वायंगणकर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला मानणारा मोठा वर्ग कोकणात आहे. परंतु शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बदलत्या भुमिकेने कोकणातील सामान्य शिवसैनिकांनी उबाठाची साथ सोडल्याचे स्पष्ट झाले आहे.कोकणच्या राजकारणातून जि.प.च्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेली राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरेगट) अस्तित्वहिन झाला आहे.आठ वर्षानंतर झालेल्या या निवडणुकीतून विधानसभेचा अंदाज बांधता येतो असे मानले जाते. या निकालाने कोकणातील चारही जिल्ह्यांमध्ये भाजपा, शिवसेना(शिंदेगट) राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवारगट) या महायुतीला मोठे आणि चांगले यश मिळालं आहे. बिनविरोध सदस्य काही मुंबईतच आणता येतात असे नाही तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, पंचायत समितीत मिळून तब्बल २५ सदस्य बिनविरोध निवडून आणण्याची किमया सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना.नितेश राणे यांनी करून दाखवली आहे…
महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणुक निकाल नुकतेच जाहिर झाले.या १२ जिल्हा परिषद निवडणुकीत कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, निवडणुक निकालाने भारतीय जनता पक्ष, शिवसेना(शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवारगट) या महायुतीत घटक पक्षांनी या निवडणुकीत चांगल यश मिळवत कोकणात महायुती भक्कम असल्याचे सिद्ध केले आहे. तर कोकणातील तीन्ही जिल्ह्यांमध्ये मिळून महाविकास आघाडी कुठेच दिसली नाही. महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवारगट) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे तीन्ही पक्ष कुठेच दिसले नाहीत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला कोकणात फक्त १२ जागा जिंकता आल्या आहेत. कधी नव्हे अशी दारूण अवस्था उबाठाची झाली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळून उबाठा सेनेचा फक्त एकच आमदार आहे. ते म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरचे आमदार भास्कर जाधव. कोकणात नेतृत्व हरवलेली उबाठा सेना आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात उबाठा सेनेचे ३ सदस्य निवडुन आले आहेत. उबाठाचे ३९ सदस्य असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात यावेळच्या निवडणुकीत मात्र अवघे ५ सदस्य उबाठा सेनेचे निवडून आले आहेत. या ५ मध्ये आ.भास्कर जाधव यांचे सूपुत्र विक्रांत जाधव हे आमदारपुत्र या निवडणुकीत विजयी झाले आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये ५९ जिल्हा परिषद सदस्य संख्येमध्ये भाजपा १५, शिवसेना(शिंदेगट) २३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवारगट) १५, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना ४, इतर २ याप्रमाणे सदस्य निवडून आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्येही शिवसेना शिंदेगट ४१, भाजपा ५, उबाठा सेना ५ याप्रमाणे या जिल्हा परिषदेत सदस्य विजयी झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष २७, शिवसेना एकनाथ शिंदे गट-१३, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ३, अपक्ष ६ निवडून आले आहेत. एकेकाळी कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता असे म्हटले जायचे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला मानणारा मोठा वर्ग कोकणात आहे. परंतु शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बदलत्या भुमिकेने कोकणातील सामान्य शिवसैनिकांनी उबाठाची साथ सोडल्याचे स्पष्ट झाले आहे. कोकणात शिवसेना उबाठाचे नेतृत्व करणाऱ्या माजी खासदार विनायक राऊत यांचे आणि रत्नागिरीतील उबाठाचे एकमेव आमदार भास्कर जाधव यांच्याशी पटत नाही. सहाजिकच अनेकवेळा आ.भास्कर जाधव यांनी माजी खा.विनायक राऊत यांच्या कार्यपद्धतीबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात उबाठाचे माजी आमदार वैभव नाईक आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे वैर सर्वश्रृत आहे. उबाठाच्या नेतृत्वातील गटबाजी आणि शिवसैनिकांना गृहीत धरण्याने कोकणातील शिवसैनिक हतबल झाला आहे. याउलट रायगड जिल्ह्यात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आ.महेंद्र थोरवे, मंत्री भरतशेठ गोगावले, आ.दळवी अशी भरभक्कम फळी कार्यरत आहे. राष्ट्रवादीचे खा.सुनिल तटकरे व मंत्री ना.अदिती तटकरे यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व राखण्यात यश मिळवले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत, आ.किरण सामंत या सामंत बंधूनी शिवसेना शिंदेगटाचा गड निर्माण करत अधिक मजबुत केला आहे. भाजपाने या निवडणुकीत रत्नागिरीत चंचू प्रवेश निश्चितपणे मिळवला आहे. २०१७ पर्यंत रत्नागिरी जिल्हा परिषदेत शिवसेना उबाठा मजबुतीने उभी होती. अनेकवर्षे शिवसेनेचे या जिल्हा परिषदेत वर्चस्व राहीले होते. या निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात सामंत बंधूनी आपले वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा-शिवसेना(शिंदेगट) राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवारगट) यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली यावेळची जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुक लढविली गेली. गेली २७ वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत खा.नारायण राणे यांचेच वर्चस्व राहीले आहे. यावेळच्या निवडणुकीतही पुन्हा एकदा सिंधुदुर्गातील जनतेने राणे यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री ना.नितेश राणे शिवसेना शिंदेगटाचे आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा शिवसेने महायुतीने चांगल यश प्राप्त केले आहे.
सावंतवाडी तालुक्यात अपक्षांच्या आडून मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न झाला. अपक्षांच्या आडून विरोध करण्याचा प्रयत्न जिल्हाभरात करण्याचा प्रयत्न काहींनी जरूर केला. परंतु राणेंवर विश्वास असणाऱ्या सिंधुदुर्गातील जनतेने आम्ही महायुती म्हणजेच राणें सोबतच हे देखिल दाखवुन दिले आहे. आठ वर्षानंतर झालेल्या या निवडणुकीतून विधानसभेचा अंदाज बांधता येतो असे मानले जाते. या निकालाने कोकणातील चारही जिल्ह्यांमध्ये भाजपा, शिवसेना(शिंदेगट) राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवारगट) या महायुतीला मोठे आणि चांगले यश मिळालं आहे. बिनविरोध सदस्य काही मुंबईतच आणता येतात असे नाही तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, पंचायत समितीत मिळून तब्बल २५ सदस्य बिनविरोध निवडून आणण्याची किमया सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना.नितेश राणे यांनी करून दाखवली आहे. यामुळे कोकणच्या राजकारणातून या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेली राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरेगट) अस्तित्वहिन झाला आहे. मतांची गोळा बेरीज करून शिवसेना उबाठा मजबुत असल्याची आकडेवारी दाखविण्याचा प्रयत्न सध्या कोकणात केला जात आहे. परंतु महायुतीला या निवडणुकीत कडवे आव्हान उभे करणे शक्य होते. परंतु खरंतर हरलेल्या मनाने कोणतीच निवडणुक किंवा कोणत्याही कामात यश मिळवता येत नाही. उबाठाची कोकणात ही अशी स्थिती आहे. ही निवडणुक महायुतीपेक्षाही महाविकास आघाडी अर्थात उबाठा सेनेसाठी अधिक महत्वाची होती. परंतु नेतृत्वात जिंकण्याची उमेदच नव्हती. माजी खासदार विनायक राऊत आणि माजी आमदार वैभव नाईक यांचा गेल्या दहावर्षापासून एकमेव कार्यक्रम म्हणजे राणेंवर टिका करणे. या टिका करण्याने उबाठा वाढवता येत नाही हे विनायक राऊत आणि वैभव नाईक यांना कधी कळलेच नाही. विकासाचा विचार जनतेसमोर ठेवण्याची आवश्यकता असते. पण असे कधी काहीच घडले नाही. यामुळे कोकणात या निवडणुकीत महायुती अधिक मजबुतीने उभी राहू शकली.












