खेड (प्रतिनिधी) :
खेड शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला शिवजयंती उत्सव अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. पारंपरिक वेशभूषा, आकर्षक सजावट, रथावरील जिवंत देखावा आणि ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीमुळे संपूर्ण शहर शिवमय झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती उत्सव समिती, खेड यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवाची सुरुवात भरणे नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यानंतर ढोल-ताशांच्या निनादात आणि भगव्या ध्वजांच्या साक्षीने भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला.
या मिरवणुकीत पारंपरिक पोशाख परिधान केलेले युवक-युवती, आकर्षक पालख्या, तसेच रथावर साकारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिवंत देखावा हे प्रमुख आकर्षण ठरले. महाराजांच्या सिंहासनावर विराजमान असलेल्या पुतळ्याची देखणी आणि भव्य सजावट पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मिरवणूक खेडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत होती.
ढोल-ताशांच्या गजरात आणि डीजेच्या तालावर शिवभक्तांनी जल्लोषपूर्ण वातावरण निर्माण केले. भगवे झेंडे फडकवत ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी या मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
दरम्यान, खेड बस स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा चालक मालक सेनेच्या वतीने मिरवणुकीत सहभागी झालेल्या शिवभक्तांसाठी शीतपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. या उपक्रमाचे शिवभक्तांकडून विशेष स्वागत आणि कौतुक करण्यात आले.
या भव्य शिवजयंती उत्सवामुळे खेड शहरात उत्साह, अभिमान आणि एकतेचे वातावरण निर्माण झाले असून, मोठ्या संख्येने शिवभक्तांनी सहभाग घेत छत्रपती शिवाजी महाराजांना भावपूर्ण अभिवादन केले.













