साटवली भंडारवाडी येथील घटना, पाच जणांवर गुन्हा दाखल
लांजा (प्रतिनिधी ) सामायिक घराच्या जुन्या वादातून ६५ वर्षीय महिला आणि तिच्या पतीला मारहाण तसेच ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना तालुक्यातील साठवली भंडारवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबतची फिर्याद सौ. विजया प्रभाकर चव्हाण (वय ६४ वर्षे राहणार साठवली भंडारवाडी) यांनी लांजा पोलीस ठाण्यात केली आहे. विजया चव्हाण आणि सुरेश यशवंत चव्हाण (वय ६३) हे एकमेकांचे नातेवाईक असून यांच्यामध्ये सामायिक घरावरून सन २०२२ पासून वाद चालू आहेत. रविवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या दरम्याने विजया चव्हाण या आपल्या घरात बसलेल्या असताना महेंद्र सुरेश चव्हाण (वय ३१वर्षे) याचे लग्न असल्यामुळे देवाला नमस्कार करण्यासाठी
सुरेश चव्हाण व पाचजण आले होते. महेंद्र चव्हाण हा दारात उभा राहून घराच्या पायरीवर फुले ठेऊन नमस्कार करत असताना त्याचे वडील सुरेश चव्हाण यांनी घरात येऊन देवाला नमस्कार कर असे सांगितले. यावेळी महेंद चव्हाण याने या घरात आपले कोण आहे? असे बोलून विजया चव्हाण व त्यांच्या पती यांना शिवीगाळ करू लागला. यावेळी विजया चव्हाण यांनी तू आम्हाला शिवीगाळ का करतो असे विचारले .
त्याचा राग येऊन महेंद्र चव्हाण यांने हाताने ठोशाने विजया चव्हाण यांना मारहाण केली. तर सुनिता सुरेश चव्हाण (वय ५७) आणि दीपाली सुरेश चव्हाण ( ३२ वर्षे) यांनी विजया चव्हाण यांना पकडून ठेवले. त्यांना सोडवण्यासाठी पती आले असता त्यांनाही हात ओढून दमदाटी केली. तसेच घराच्या बाजूला ठेवलेला काठ्या उचलून त्या काठ्यांनी जिवे ठार मारण्याची व लग्न आटोपल्यावर सायंकाळी तुम्हाला बघून घेतो अशी धमकी दिली.
याप्रकरणी विजया प्रभाकर चव्हाण यांनी केलेल्या तक्रारीनुसार लांजा पोलिसांनी महेंद्र सुरेश चव्हाण (वय ३१), जितेंद्र सुरेश चव्हाण (वय ३६), सुरेश यशवंत चव्हाण (वय ६३), सुनिता सुरेश चव्हाण (वय ५७) आणि दिपाली सुरेश चव्हाण (वय ३२ वर्षे) या पाचही जणांवर भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १९१(१), १९०, ११५ (२), ३५२, ३५१(२) या प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे .
याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल नासिर नांवळेकर हे करत आहेत.











