फाटक प्रशालेच्या हॉलिबॉल संघाचा विभागात दबदबा

Google search engine
Google search engine

राज्य स्पर्धेत प्रथमच धडक ; सातारा संघाला नमवले

रत्नागिरी : बलाढ्य सातारा संघाला नमवून रत्नागिरी जिल्ह्याच्या फाटक प्रशालेने विभागीय शालेय हॉलिबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावत इतिहास घडवला. हा संघ प्रथमच राज्य स्पर्धेत सहभागी होणार आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय 17 वर्षाखालील मुला-मुलींच्या विभागीय स्तरावरील व्हॉलीबॉल स्पर्धा सातारा क्रीडा संकुलला झाल्या. या विभागीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धांमध्ये एकूण आठ जिल्हे सहभाग घेतात. त्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग,कोल्हापूर ग्रामीण, कोल्हापूर मनपा, सांगली ग्रामीण, सांगली मनपा, इचलकरंजी मनपा व सातारा. पूर्ण दिवसभर चालणाऱ्या या व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याकडून फाटक हायस्कूल रत्नागिरी या शाळेने रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते.

फाटक हायस्कूल या शाळेचा पहिला सामना कोल्हापूर मनपा बरोबर सुरू झाला सुरशीच्या झालेल्या या सामन्यांमध्ये फाटक हायस्कूल रत्नागिरीच्या खेळाडूंनी 25-22, 16-25, 15-13 अशा 2-1 ने सामना जिंकून पुढील फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीचा सामना सिंधुदुर्ग या संघाबरोबर सुरू झाला या चुरशीच्या सामन्यामध्ये सिंधुदुर्गचा 25-22,14-25,15-09 असा 2-1 ने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामना सातारा जिल्ह्याबरोबर सुरू झाल्यानंतर आपली सगळी कौशल्य पणाला लावून सातारा संघाचा फाटक हायस्कूल रत्नागिरीच्या संघाने 25-23, 25-19 अशा सलग दोन सेट ने मात करून कोल्हापूर विभागीय स्पर्धेवर आपले नाव कोरले. फाटक हायस्कूलच्या संघामधून वरूण वारसे, कविराज सावंत, तनिष मयेकर, तन्मय जाधव( कर्णधार ), प्रज्वल काजरेकर,प्रणव पालांडे, रोहन मोरे यांनी उत्कृष्ट खेळ दाखवला तसेच मंथन नेरकर, राहुल देवरुखकर, साई तळेकर, हर्ष मोरे या खेळाडूंनी खेळणाऱ्या खेळाडूंना बाहेरून प्रोत्साहन दिले.

या संघाला क्रीडाशिक्षक मंदार सावंत यांनी मार्गदर्शन केले. तसेच ओंकार पोयरेकर यांनी सहाय्यक प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडली. यावेळी जितेंद्र सावंत व महेश खातू खेळाडूना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते. दि न्यू एज्युकेशन सोसायटी व फाटक हायस्कूल तसेच श्रीमान वी.स. गांगण कला वाणिज्य व कै.त्रि.प.केळकर कनिष्ठ महाविद्यालयाकडून सर्व खेळाडुंची भव्य मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला.मुख्याध्यापक किशोर लेले, दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष सौ. रंजना भावे, उपमुख्याध्यापक आनंद पाटणकर, पर्यवेक्षक राजन कीर, शिक्षक अजित चवेकर यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सेवक यांनी संघातील खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आणि हिंगोली या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी जिल्ह्यामधून फाटक हायस्कूल शाळेचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.कोल्हापूर विभागामध्ये विजेतेपद मिळवण्याचे अनेक वर्षाचे स्वप्न होते. आतापर्यंत अंतिम सामान्यपर्यंत पोचता आले होते. यंदा फाटक प्रशालेने ते यश मिळवत प्रथमच राज्य स्पर्धेत धडक दिली आहे असे प्रशिक्षक मंदार सावंत म्हणाले.