राजापुरात नगर परिषदेचा ‘बुलडोझर’; छत्रपती शिवाजी महाराज पथावरील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

राजापूर (वार्ताहर): गेल्या काही वर्षापासून शहरातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा जोरदार चर्चेत असताना मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद प्रशासन अनधिकृत बांधकामांच्या विरोधात अ‍ॅक्शनमोडमध्ये आली आहे. त्यामध्ये शासनाच्या निर्देशानुसार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पथ रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने शुकवारी सकाळी थेट काढून टाकण्याची धडक कारवाई करण्यात आली. शहरातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधातील ही धडक कारवाई भविष्यामध्ये अधिक आक्रमकपणे राबविण्यात येणार असल्याचा इशाराही या कारवाईच्या माध्यमातून नगर परिषद प्रशासनाने दिल्याने वर्षानुवर्षे अनधिकृत बांधकाम उभी ठेवणाऱ्यांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहेत. तर या कारवाईचे नागरिकांतून स्वागत होत आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पथ रस्त्यावरील अनधिकृत बांधकामाच्या विरोधातील या कारवाईच्यावेळी मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, कार्यालयीन अधिक्षक जितेंद्र जाधव यासह नगर परिषदेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस निरिक्षक अमित यादव यांच्या नेतृत्वाखाली पोलिस कुमकही उपस्थित होती.

शहरातील बाजारपेठेसह अन्य भागातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा गेल्या काही वर्षापासून सातत्याने चर्चेत राहीलेला आहे. या अनधिकृत बांधकामांच्या विरोधात नगर परिषदेने कारवाई करावी अशी सातत्याने नागरीकांकडून मागणी केली जात होती. मात्र, अनधिकृत बांधकामांच्या विरोधात फारशा कारवाई होत नव्हत्या. अशातच नगर परिषद आता अनधिकृत बांधकामांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत कारवाईच्या अ‍ॅक्शनमोडमध्ये आली आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पथ रस्त्यावरील अनधिकृत बांधकामावर शुक्रवारी धडक कारवाई केली. त्यामध्ये जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत बांधकाम परिषदेने काढून टाकले. या कारवाईद्वारे वर्षानुवर्षे शहरामध्ये अनधिकृत बांधकामे उभी ठेवणाऱ्यांना एकप्रकारे धडक कारवाईचा इशारा नगर परिषद प्रशासनाने दिला आहे.