चिपळूण (प्रतिनिधी) : केवळ मैदानावर मेहनत घेऊन चालत नाही, तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकून राहण्यासाठी खेळाडूंनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. संतुलित आणि पोषक आहार हाच खेळातील यशाचा खरा पाया असून, योग्य आहारातूनच शारीरिक क्षमता आणि मानसिक स्थैर्य मिळते, असे प्रतिपादन डॉ. चंद्रजीत जाधव यांनी केले.
सावर्डे येथील विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘डेरवण युथ गेम्स’च्या भव्य उद्घाटन सोहळ्यात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. क्रीडा ज्योत पेटवून या क्रीडास्पर्धांचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी हजारो खेळाडू आणि क्रीडाप्रेमींची उपस्थिती होती.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. जाधव म्हणाले की, आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शारीरिक ताकद पुरेशी नसून मानसिक संतुलनही तितकेच महत्त्वाचे आहे. योग्य पोषक तत्त्वांचा समावेश असलेला आहार खेळाडूंना ही मानसिक ताकद देतो. जंक फूडमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन खेळाडूंनी प्रथिने, जीवनसत्त्वे आणि घरगुती आहाराला प्राधान्य द्यावे. तसेच मोबाईल व तंत्रज्ञानाचा वापर मर्यादित आणि योग्य हेतूसाठी करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उद्योजक कमलेश जोशी होते. यावेळी रुग्णालय संचालिका डॉ. सौ. सुवर्णा पाटील, सौ. शरयू यशवंतराव, क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, अजित गाळवणकर, संदीप तावडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी आणि मोठ्या संख्येने युवा खेळाडूंनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. डॉ. जाधव यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे खेळाडूंमध्ये नवचैतन्य आणि उत्साह संचारल्याचे चित्र पाहायला मिळाले.
एसव्हीजेसीटीच्या क्रीडासंकुलात ६ मार्चपर्यंत अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, टेबल टेनिस, जलतरण, तिरंदाजी, नेमबाजी, बुद्धिबळ, कॅरम, लंगडी, खो-खो, कबड्डी, मल्लखांब, बास्केटबॉल, फुटबॉल आणि व्हॉलीबॉल अशा विविध खेळांच्या स्पर्धा रंगणार आहेत. या क्रीडामहोत्सवासाठी मुंबई, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नाशिक आणि औरंगाबाद येथून खेळाडू व संघ डेरवण येथे दाखल झाले आहेत. सुमारे सात हजार खेळाडूंनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली असून, अटीतटीच्या लढती पाहण्यासाठी क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहात आहेत.
यंदाही या स्पर्धांतील विजेत्या खेळाडूंना पदके, चषक आणि रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. एकूण १२०० पदके आणि ११५ करंडक खेळाडूंना बक्षीस स्वरूपात प्रदान करण्यात येणार असून, डेरवण युथ गेम्स हा क्रीडासोहळा युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्थान ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.












