▪️SQAAF मानांकन प्रक्रियेत उल्लेखनीय यश; गुणवत्तावाढीचा नवा आदर्श
▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 अ + श्रेणी प्राप्त शाळांमध्ये शाळेचा समावेश
मसुरे | झुंजार पेडणेकर
देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुणकेश्वर कातवण या शाळेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या SQAAF (School Quality Assessment and Accreditation Framework) या गुणवत्तामापन प्रक्रियेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेच्या सर्वांगीण विकासाचा, शैक्षणिक गुणवत्तेचा आणि प्रशासकीय कार्यपद्धतीचा सखोल आढावा घेतल्यानंतर शाळेला उच्च मानांकन प्राप्त झाले आहे.
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात शाळेने विविध शैक्षणिक उपक्रम, गुणवत्ता वृद्धी कार्यक्रम, विद्यार्थी-केंद्रित अध्यापन पद्धती, तसेच तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या माध्यमातून सातत्याने प्रगती साधली. याच पार्श्वभूमीवर SQAAF अंतर्गत शाळेचे बाह्य मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील 429 शाळांना बाह्यमूल्यमापनात अ + श्रेणी प्रात झाली त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक 3 शाळांमंध्ये कुणकेश्वर कातवण या शाळेचा समावेश आहे.या प्रक्रियेत अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांची प्रगती, सहशालेय उपक्रम, भौतिक सुविधा, व्यवस्थापनाची कार्यक्षमता आदी विविध निकषांवर परीक्षण करण्यात आले.
शाळेने विविध स्पर्धापरीक्षामध्ये घवघवीत यश मिळविले आहे. गेल्यावर्षी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आला होता. अनेक विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमामध्ये प्राविण्य संपादन करत शाळेचे नाव उंचावले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या उद्दिष्टाने शिक्षकवृंदाने घेतलेले परिश्रम आणि विद्यार्थ्यांनी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न यांचेच हे फलित असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
राज्य शैक्षणिक संस्थेच्या व प्रशिक्षण परिषदेकडून शाळेच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली असून, ग्रामीण भागातील शाळांसाठी कुणकेश्वर कातवण शाळा एक आदर्श ठरत आहे. शैक्षणिक गुणवत्ता, संस्कारक्षम वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर दिलेला भर यामुळे पालकवर्गातही समाधान व्यक्त होत आहे.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, “गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, तसेच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व सामाजिक विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील. आगामी काळातही शाळेला आणखी उंचीवर नेण्याचा आमचा निर्धार आहे.”
शाळेमध्ये इन्टर ऍक्टिव्ह बोर्ड, प्रोजेक्टर, टॅब, संगणक कक्ष याच्यामाध्यमातून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी सर्वागीण विकासासाठी बुद्धिबळ, तायक्वादो, कॅरम यासारखे वर्ग मोफत दिले जातात. अजूनही उपक्रम नियोजित आहेत.
या शाळेच्या समई नृत्याच्या कार्यक्रमाला सुद्धा जिल्ह्यातून मागणी होत आहे. यामधून समाजप्रबोधन व आपली संस्कृती जपाण्याचा प्रयत्न शाळेने केला आहे.
सन 2024/2025 मध्ये शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 मध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला होता.
या शाळेच्या विकासासाठी मुख्याद्यापक श्रीम. दिपाली ढोके, शिक्षक श्री धर्मराज धुरत,श्री.सोमनाथ माने,श्री.हेमंत पराडकर. श्रीम. अलकनंदा शिरोडकर, स्वयंसेवक श्रीम. आकांक्षा कासले मेहनत घेत आहेत.
ग्रामपंचायत कुणकेश्वर,सरपंच श्री. महेश ताम्हणकर,उपसरपंच श्री. शशिकांत लब्दे ,देवस्थान कुणकेश्ववर अध्यक्ष श्री. एकनाथ तेली, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. चंद्रशेखर जोईल, उपाध्यक्ष श्रीम. साक्षी धुरी, देवस्थान माजी अध्यक्ष श्री. संतोष लब्द ,वाडी अध्यक्ष, श्री. संजय आचरेकर,माजी अध्यक्ष श्री. प्रदीप मुणगेकर, भक्तप्रल्हाद गावडे तसेच वाडीतील सर्व ग्रामस्थ, पालक, आजी माजी विद्यार्थी, मुंबईस्थित ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.
या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारीश्री. मुकुंद शिनगारे, विस्तार अधिकारी श्री. सुदाम जोशी,ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी व शिक्षणप्रेमींनी शाळेचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कुणकेश्वर कातवण शाळेने गुणवत्तेच्या दिशेने टाकलेले हे पाऊल निश्चितच इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.











