इचलकरंजीत पोलिसांसमोरच गोळीबार करून ठार मारण्याचा प्रयत्न…

प्रेमप्रकरणातून गोळीबार झाल्याची माहिती…

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

कोल्हापूर : इचलकरंजी येथे बुधवारी रात्री उशिरा एका २२ वर्षीय गुंडावर गोळीबार करण्यात आला.ओंकार जितेंद्र कांबळे (रा. सांगलीवाडी. जि.सांगली) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.जखमी ओंकार हा एका गुन्ह्याच्या शिक्षेतून जामिनावर सुटला होता.पोलिसांसमोरच गोळीबार करून ठोकण्याची इचलकरंजी शहरात पहिलीच घटना आहे. अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातून पोलिसांसोबत बाहेर पडलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर भरत रस्त्यात रिव्हॉल्वर मधून गोळी झाडण्यात आली.

या घटनेमुळे शहरात एकच चळवळ उडाली आहे.जखमी झालेल्या ओंकार याला तातडीने कोल्हापुरातील खासगी रुग्णालयातील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ,संबंधित जखमी आणि आरोपीचे काही दिवसांपूर्वी प्रेम प्रकरणातून वाद झाला होता. त्यातून ओंकार कांबळे याला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.नंतर ते जामिनावर बाहेर आले होते. या पार्श्वभूमीवर कारवाईसाठी ओंकार याला बुधवारी दुपारी येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलण्यात आले होते. दरम्यान हल्लेखोर अनुराग सूर्यवंशी याने व्हाट्सअप ला ‘रिप्लाय देणार’ असे स्टेटस ठेवून आव्हान दिल्याचे समोर आले होते.

यावेळी कार्यालयाबाहेर अनुराग सूर्यवंशी व त्याचे काही साथीदार हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती ओंकार याने पोलिसांना दिली होती.जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील पोलीस जगदीश पाटील यांना ओंकार सोबत जाण्याची सूचना देण्यात आली. दुपारच्या सुमारास ओंकार तसेच पोलीस जगदीश पाटील हे दुचाकीवरून कार्यालयातून बाहेर पडले.
सांगली रोडवरील बादशाह पशूखाद्य दुकानासमोर ते पोहोचले असता मागून दुचाकीवरून आलेल्या अनुराग सूर्यवंशीने अचानक जवळ येऊन रिव्होल्वरमधून ओंकारवर गोळी झडली. ती गोळी ओंकारच्या बाजूच्या बरगडीत घुसली.
हा प्रकार रात्री आठच्या सुमारास घडला.

अचानक झालेल्या गोळीबारामुळे पोलीस पाटील आणि ओंकार हे दोघे ही मोटारसायकलीवरून खाली कोसळले.गोळीबारानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पाटील यांनी प्रसंगावधान राखत जखमी ओंकार याला जवळील खासगी रुग्णालयात नेले.दरम्यान हल्लेखोर अनुराग सूर्यवंशी दुचाकीवरून प्रसार झाला.ही माहिती मिळताच गावभाग पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पंचनामा सुरू होता.पुढील तपास जयसिंगपूर पोलिस करत आहेत.