जन्मतिथीप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती दिनाच्या पूर्वसंध्येला निघाली भव्य रॅली
तरूणांसोबतच महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी
राजापूर (प्रतिनिधी):
राजापूर शहरात जन्मतिथीप्रमाणे शुक्रवारी ६ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सवाच्या पूर्वसंध्येला शिवप्रेमींनी भव्य अशी दुचाकी रॅली काढत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. वाहन फेरीत सहभागी झालेल्या शिवप्रेमींनी भगव्या टोप्या, फेटे परिधान केले होते. तर भगवे ध्वजही फडकत होते. त्यामुळे राजापूर शहरातील वातावरण भगवेमय होऊन गेले होते. शिवप्रेमींच्या उत्साहाला यावेळी आनंदाचे उधाण आले होते. विशेष म्हणजे या वाहन फेरीत तरूणांसोबतच महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
प्रतिवर्षाप्रमाणे राजापूरातील शिवस्मृती मंडळाच्यावतीने फाल्गुन कृष्णपक्ष तृतीया शुक्रवार दि. ६ मार्च रोजी जवाहर चौक येथील शिवस्मारक येथे तिथीनुसार शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त सलग तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बुधवारी ‘गाथा शिवरायांची’ या अंतर्गत स्थानिक कलाकारांचे शिवचरित्रावरील सादरीकरण वेशभूषा, ऐतिहासिक शिवविचार, पोवाडा, नृत्यकला आदी वीररसाचे कार्यक्रम पार पडले.
त्यानंतर गुरूवारी आणि शुक्रवारी वाहन फेरी, चित्ररथ मिरवणूक, युध्दकला प्रात्यक्षिक व राष्ट्रीय व्याख्याते श्रीनिवास पेंडसे प्रस्तृत ‘गर्जती सह्याद्रीचे कडे’ ही छत्रपती शिवाजी महाराजांची संगीत गौरव गाथा असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
दरम्यान गुरूवारी सायंकाळी वाहन फेरी काढण्यात आली. सुरूवातीला महामार्गावरील पेट्रोलपंप येथे धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर वाहन फेरीला सुरूवात झाली.
तर जवाहर चौक येथे वाहन फेरी आल्यानंतर छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. पेट्रोलपंप मेनरोड – छत्रपती संभाजी महाराज पेठ मार्गे वरचीपेठ – राजीव गांधी स्टेडीयम बंदर धक्का छत्रपती शिवाजी महाराज पथ – कै. वैशंपायन गुरुजी पूल – गुजराळी – चापडेवाडी – ओगलेवाडी- दिवटेवाडी-साखळकरवाडी – खडपेवाडी, मोठपूल मार्गे शिवतीर्थ येथे वाहनफेरीची सांगता करण्यात आली.
वाहन फेरीदरम्यान शिवप्रेमींनी दिलेल्या घोषणांनी राजापूर शहर शिवमय झाले होते. तर सायंकाळी कै. न. चि. अपमार्जने आणि आफळे बुवांचे शिष्य यांचे शिष्य राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. संदिप मांडके बुबा, पुणे यांचे शिवचरित्रावरील कीर्तन पार पडले. यावेळी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












