मारळ व निवधे या दोन्ही गावच्या ग्रामदैवतांच्या पालख्यांच्या भेटीचा रंगला अविस्मरणीय सोहळा
देवरूख (प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील मारळ येथे श्री देव केदारलिंग व हिरादेवी या दोन भाऊ-बहिणींची मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास भेट झाली. मारळ व निवधे या दोन्ही गावच्या ग्रामदैवतांच्या पालख्यांच्या भेटीचा अविस्मरणीय सोहळा ढोलताशांच्या गजरात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत रंगला.
निवधे गावची ग्रामदैवता आई हिरादेवीची पालखी परंपरेनुसार वाजत गाजत आपल्या भावा समान असलेल्या मारळ येथील ग्रामदैवत श्री देव केदारलिंग यांच्या भेटीसाठी भक्तगणांसमवेत वाजत गाजत मारळ येथे आली. दोन्ही गावचे पहाटे सकाळी होम लागले की या दोन्ही भाऊ-बहिणींना भेटीचे वेध लागतात व तशा पाहुल खुणाही जाणवू लागतात व श्री देव केदारलिंग बहिण हिरादेवी हिच्या भेटीसाठी मारळ येथील श्री भैरीसौंभा चौक येथे आतुरतेने वाट पाहत असतात.
या दोन्ही पालख्यांच्या भेटीचा अविस्मरणीय क्षण अनुभवण्यासाठी दोन्ही गावातील ग्रामस्थ, मुंबईकर चाकरमानी व माहेरवाशीनी मोठ्या संख्येने हा आनंददायी सोहळा पाहण्यासाठी आणि आशिर्वाद घेण्यासाठी उपस्थित होते. दोन्ही पालख्यांच्या भेटीमागे दोन गावचे असलेले सलोख्याचे संबंध या सोहळ्या दरम्यान पहायला मिळतात. दोन्ही पालख्यांची भेट झाल्यानंतर पालख्या वाजतगाजत आणत भक्तगण तल्लीन होवून या शुभरुपी आनंददायी सोहळ्यात सर्वच लहान थोर मंडळी सुखावलेले पहायला मिळाले.










