सिंधुदुर्गच्या ‘ऑन कॉल रक्तदाते’ संस्थेचा गया येथे राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

चंद्रशेखर आझाद यांच्या वंशजांच्या हस्ते सन्मान : शहीद भगतसिंग युथ ब्रिगेडचा उपक्रम

सावंतवाडी । प्रतिनिधी :रक्तदान क्षेत्रात देशपातळीवर आदर्शवत कार्य करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘ऑन कॉल रक्तदाते’ संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. बिहारमधील गया येथे शहीद भगतसिंग युथ ब्रिगेडच्या वतीने आयोजित विशेष सोहळ्यात या संस्थेला ‘राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, महान क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांचे वंशज अमित आझाद यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे सचिव बाबली गवंडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

रक्तदान क्षेत्रात भारतात आघाडीवर असलेल्या ‘शहीद भगतसिंग युथ ब्रिगेड’ (गयाजी, बिहार) या संस्थेच्या वतीने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतातील विविध राज्यांतील १७० हून अधिक संस्था तसेच नेपाळमधील काही प्रतिनिधी संस्थांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव करण्यात आला. महाराष्ट्रातून ‘ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग’ने आपल्या शिस्तबद्ध आणि तत्पर सेवेच्या जोरावर या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारावर आपले नाव कोरले.

ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे सचिव बाबली गवंडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. क्रांतीकारक वारसा लाभलेल्या अमित आझाद यांच्या हस्ते सन्मान स्वीकारणे हा एक अविस्मरणीय योगायोग असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त पोलीस उप अधीक्षक दयानंद गवस यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही संस्था अहोरात्र कार्यरत आहे. शहीद भगतसिंग यांच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या चळवळीकडून ही दखल घेतली जाणे, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

 

* पुरस्कार कार्यकर्त्यांना आणि रक्तदात्यांना समर्पण*

या यशाबद्दल बोलताना अध्यक्ष दयानंद गवस म्हणाले की, “संस्थेच्या या यशाचे खरे वाटेकरी रात्रंदिवस धडपडणारे आमचे कार्यकर्ते आणि ऐनवेळी धावून येणारे रक्तदाते आहेत. हा राष्ट्रीय सत्कार आम्ही सर्व रक्तदात्यांना समर्पित करतो.”

 

या पुरस्काराबद्दल जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, राजकीय नेते आणि हितचिंतकांनी ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे अभिनंदन केले असून, संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.