कट्टा येथील पाककृती स्पर्धेत मंजुश्री मेस्त्री प्रथम!

मसुरे | झुंजार पेडणेकर : तालुका कृषी कार्यालय मालवण तर्फे राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियान अन्नधान्य पिके अंतर्गत पौष्टिक तृणधान्यावर आधारीत कट्टा येथील पाककृती स्पर्धेमध्ये मंजुश्री मेस्त्री यांच्या नाचणी मोमोज या पाककृतीस प्रथम क्रमांक प्राप्त झाला. नीता ओटवणेकर व सप्ताशीला धमापूरकर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. ममता नाईक व रत्ना लब्दे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आली. सदर पाककृती स्पर्धेस मालवण तालुक्यातून पन्नास स्पर्धकांनी सहभाग घेतला. नाचणी मोमोज, नाचणी व वरी दाबेली, राजगिरा केक,नाचणी स्मूदी, नाचणी टिक्की, नाचणीचा आंबील, वरीचा उपमा, नाचणी मोदक इ विविध नाविन्यपूर्ण पाककृती या स्पर्धेत पाहण्यास मिळाल्या. सदर पाककृती स्पर्धेसाठी सुप्रसिद्ध आहारातज्ञ डॉ गार्गी ओरोसकर व मॉम्स किचन या हॉटेल च्या मालक श्रीम ममता पालव यांनी परीक्षण केले. पाककला स्पर्धा यशस्विरित्या पार पाडण्यासाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, मालवण अधिनस्त उपकृषि व सहाय्यक कृषि अधिकारी श्रीम संचिता फाळके, श्रीम अमृता राणे, श्रीम स्नेहल जिकमडे व श्रीम विद्या कुबल यांनी विशेष प्रयत्न केले. बक्षीस वितरण उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील, तालुका कृषी अधिकारी अमोल करंदीकर, हवामान शास्त्रज्ञ डॉ उमराज मठार, डॉ गार्गी ओरसकर, उज्वला चव्हाण यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी सर्व कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.