अशोक डोंगळे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित!

मसुरे | झुंजार पेडणेकर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसूरे डांगमोडे शाळेचे शिक्षक श्री. अशोक भिमराव डोंगळे यांचा ध्येय एज्युकेशन फाउंडेशन (महाराष्ट्र राज्य) आयोजित “आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५” प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व नाविन्यपूर्ण कार्याची दखल घेत हा सन्मान मिळाला आहे.

ध्येय एज्युकेशन फाउंडेशनतर्फे दरवर्षी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला जातो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न, शैक्षणिक उपक्रमांमधील नावीन्य, तसेच समाजाभिमुख कार्य याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे.

श्री. अशोक डोंगळे यांनी आपल्या कार्यकाळात स्कॉलरशिप, नवोदय तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना उल्लेखनीय यश मिळवून दिले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवणे, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांना चालना देणे, तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम राबवणे यामध्ये त्यांचा विशेष पुढाकार राहिला आहे.

याशिवाय शाळा व परिसर विकासासाठी तसेच पालक व ग्रामस्थांच्या सहभागातून अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार व सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले असून, त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

हा पुरस्कार समारंभ पुणे येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी, पिंपरी-चिंचवड येथे मान्यवरांच्या हस्ते पार पडला. या समारंभास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.