सुमारे ५ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त
सावंतवाडी : दांडेली धनगरवाडी येथील एका बंदिस्त घरात सुरू असलेल्या रमी जुगाराच्या अड्ड्यावर सावंतवाडी पोलिसांनी धाड टाकून ११ जणांवर कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल हँडसेट, जुगारासाठी वापरण्यात येणारे पत्ते व कॉईन, टेबल-खुर्च्या, वातानुकूलन यंत्रणा, वॉटर प्युरिफायर तसेच सात दुचाकी वाहने असा मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ५ लाख ९५ हजार ५६० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी दांडेली धनगरवाडी, घर क्रमांक ५०१ येथे करण्यात आली. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४१/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ मधील कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा १० सप्टेंबर रोजी पहाटे १.४८ वाजता दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकृष्ण गोविंद पुनाळेकर यांनी त्यांच्या मालकीच्या दांडेली ग्रामपंचायत घर क्रमांक ५०१ या बंदिस्त घरामध्ये राजकुमार दिनकर कवठणकर याला जुगाराचा क्लब चालविण्यास परवानगी दिल्याचा आरोप आहे. या ठिकाणी राजकुमार कवठणकर याच्या कथित जुगार क्लबमध्ये गणेश शांताराम सोपटे, सुधीर सोमनाथ राऊळ, नंदकिशोर मनोहर नाईक, अनंत भास्कर सारंग, निरंजन आनंद नाईक, आनंद सोहन केरकर, गजानन महादेव वाडकर, श्रीधर प्रकाश पालव आणि मिलन शांताराम खवणेकर हे रमीच्या पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळताना आढळून आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या कारवाईत जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणारी दोन लोखंडी गोलाकार प्लायवूड टॉपची टेबले, विविध रंगांचे व वेगवेगळ्या किंमतींचे कॉईन, पत्त्यांचे नवीन व वापरलेले बॉक्स, रोख रक्कम, रजिस्टर, प्लास्टिक फायबर खुर्च्या, प्लास्टिक टिपॉय तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले. घटनास्थळी असलेल्या रजिस्टरमध्ये तारीख ९ सप्टेंबर २०२६ तसेच काही इसमांची नावे व पैशांची आकडेमोड लिहिलेली असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
संशयितांकडून रोख रक्कम व मोबाईल फोनही जप्त करण्यात आले.
गणेश शांताराम सोपटे याच्याकडून रोख रकमेसह रेडमी १३ सी ५ जी मोबाईल, सुधीर सोमनाथ राऊळ याच्याकडून रोख रकमेसह विवो कंपनीचा मोबाईल, नंदकिशोर मनोहर नाईक याच्याकडून रोख रकमेसह नोकिया मोबाईल, अनंत भास्कर सारंग याच्याकडून रोख रकमेसह रेडमी मोबाईल, निरंजन आनंद नाईक याच्याकडून विवो वाय ७० मोबाईल, आनंद सोहन केरकर याच्याकडून रोख रकमेसह रेडमी मोबाईल, गजानन महादेव वाडकर याच्याकडून रोख रकमेसह नोकिया मोबाईल, श्रीधर प्रकाश पालव याच्याकडून रोख रकमेसह रिअलमी मोबाईल, तर मिलन शांताराम खवणेकर याच्याकडून रेडमी व आयटेल कंपनीचे मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले.
याशिवाय घटनास्थळावरून व्हॉलटास कंपनीचा वॉटर प्युरिफायर, लॉयड कंपनीचा एअर कंडिशनर व स्टॅबिलायझर, चार प्लास्टिक टिपॉय, २६ प्लास्टिक फायबर खुर्च्या, तीन प्लास्टिक बॉक्स, जुगारासाठी वापरण्यात येणारे कॉईन तसेच पत्त्यांचे ३४ वापरलेले बॉक्स आणि तीन बॉक्समधील नवीन पत्त्यांचे कॅट जप्त करण्यात आले.
पोलिसांनी या कारवाईदरम्यान जुगाराच्या ठिकाणी आढळलेल्या सात दुचाकी वाहनेही ताब्यात घेतली. त्यामध्ये बजाज पल्सर २२० क्रमांक GA-११-B-०९९९, हिरो स्प्लेंडर प्लस क्रमांक MH-०७-AP-३३४५, होंडा अॅक्टिव्हा क्रमांक MH-०७-AV-२५३६, टी.व्ही.एस. ज्युपिटर क्रमांक MH-०७-AQ-३३१९, स्प्लेंडर प्लस क्रमांक MH-०७-AU-४१४१, अॅक्टिव्हा क्रमांक GA-११-J-०८३० आणि अॅक्टिव्हा ५ जी क्रमांक GA-११-F-१४१८, तसेच टी.व्ही.एस. स्टार सिटी प्लस क्रमांक MH-०७-AA-४८७० या वाहनांचा समावेश आहे.
या कारवाईत सर्व आरोपींना BNSS कलम ३५(३) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे. सात वर्षांपेक्षा अधिक शिक्षेची तरतूद असलेला हा गुन्हा नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ASI/८६ टाकेकर, सावंतवाडी पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस दूरक्षेत्र सातार्डा करीत आहेत.
पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रो. DySP श्री. शेलार, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, API श्री. हिंगे तसेच सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल राहुल बंडोपंत बर्गे यांनी दिली असून, गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही WHC ३०० कदम यांनी केली.













