कारीवडे येथे अपघातात झांज वादक संतोष गुळदवेकर गंभीर जखमी

सामाजिक बांधिलकीच्या मदतीने जखमी युवकाला तातडीने उपचार

सावंतवाडी | प्रतिनिधी : कारीवडे येथील गोठण देवस्थानजवळ काल रात्री बाराच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात संतोष गुळदवेकर (वय २३, रा. माडखोल) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. एका दशावतार नाटक कंपनीत झांज वादक म्हणून कार्यरत असलेला संतोष, नाटकाचा प्रयोग संपवून घरी परतत असताना हा अपघात घडला.

संतोष गुळदवेकर हा तरुण एका नाटक कंपनीमध्ये झांज वाजवण्याचे काम करतो. काल रात्री नाटकाचा कार्यक्रम संपवून तो आपल्या मोटरसायकलने माडखोल येथील राहत्या घरी जात होता. रात्री बाराच्या सुमारास कारीवडे-गोठण देवस्थान परिसरात आला असता, त्याला अचानक झोपेची डुलकी लागली. यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या वाहनाला त्याने जोरदार धडक दिली. या धडकेत संतोषच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली असून हात फॅक्चर झाले आहेत.

सामाजिक कार्यकर्त्यांची तत्परता

अपघाताची माहिती मिळताच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी निलेश राऊळ, त्यांचे सहकारी शरद पवार आणि सामाजिक कार्यकर्ते अमोल आरोस्कर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी संतोषला तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

या घटनेची माहिती ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’चे रवी जाधव यांना देण्यात आली. माहिती मिळताच जाधव यांनी रुग्णालयात धाव घेत जखमीच्या प्राथमिक उपचारांची व्यवस्था केली. त्यानंतर संतोषच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना अपघाताची माहिती दिली. संतोषची प्रकृती पाहता, पुढील अधिक उपचारांसाठी त्याला तातडीने गोवा येथील बांबोळी रुग्णालयात हलवण्यात आले.

आज सकाळी रवी जाधव यांनी संतोषच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता, त्याच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असल्याचे समजते. ऐन मध्यरात्री देवदूत बनून धावून आलेले सामाजिक कार्यकर्ते अमोल आरोस्कर, रवी जाधव आणि रुग्णालय कर्मचारी निलेश राऊळ यांच्या सतर्कतेमुळे जखमी युवकाला वेळेत उपचार मिळू शकले. त्यांच्या या मदतकार्याबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.