दिल्लीतील ‘साहित्योत्सवा’त स्नेहा कदम यांच्या कवितेचा डंका

सावंतवाडीच्या कन्येने गाजवले बहुभाषिक युवा काव्य संमेलन

सावंतवाडी | प्रतिनिधी : देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथे साहित्य अकादमी आणि सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे आयोजित ‘फेस्टिव्हल ऑफ लेटर्स’ अर्थात साहित्योत्सव या प्रतिष्ठित सोहळ्यात महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या सोहळ्यांतर्गत पार पडलेल्या ‘बहुभाषिक युवा काव्य संमेलनात’ महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना सावंतवाडीची युवा कवियित्री स्नेहा विठ्ठल कदम हिने आपल्या अमोघ शैलीत आणि दमदार आवाजात काव्य सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

*बहुभाषिक सादरीकरणाला दाद*

या राष्ट्रीय स्तरावरील संमेलनासाठी स्नेहा कदम यांची विशेष निमंत्रित म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांनी केवळ मराठीच नव्हे, तर आपल्या कवितांचे हिंदी आणि इंग्रजी अनुवादही अत्यंत प्रभावीपणे सादर केले. भाषेच्या सीमा ओलांडून स्नेहा यांच्या शब्दांनी उपस्थित रसिक आणि मान्यवरांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या सादरीकरणाला सभागृहात टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद मिळाली.

मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव

साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल आणि या संमेलनातील उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल स्नेहा कदम यांचा विशेष गौरव चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेल्या साहित्य क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी स्नेहा यांच्या काव्यप्रतिभेचे आणि त्यांच्या सामाजिक-साहित्यिक जाणीवांचे विशेष कौतुक केले.

*विविध राज्यांतील कवींचा सहभाग*

या काव्य संमेलनात संपूर्ण देशभरातून निवडक युवा कवींना आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये उर्दू, डोंगरी, कन्नड, पंजाबी, सिंधी, हिंदी आणि इंग्रजी अशा विविध भारतीय भाषांमधील अव्वल कवींनी आपल्या रचना सादर केल्या. या विविधतेत महाराष्ट्राचा आणि पर्यायाने कोकणचा (सावंतवाडी) आवाज दिल्लीच्या व्यासपीठावर खणखणीतपणे पोहोचवण्याचे काम स्नेहा यांनी केले.

सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्नेहा विठ्ठल कदम यांनी राष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या या यशामुळे कोकणच्या साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या यशाबद्दल साहित्यिक, मित्रपरिवार आणि सावंतवाडीकरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.