ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के; विद्यार्थ्यांचे उज्वल यश

खेड (प्रतिनिधी) : खेड येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल (सी.बी.एस.ई.), मोरवंडे-बोरज या शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल यंदा शंभर टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. एकूण ६६ विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली होती आणि सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

या निकालात कुमार आराध्य अनिरुद्ध आपटे याने ९७.८० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला, तर आर्यन अजय कदम याने ९७.६० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. अभिनव दिनेश मेस्त्री ९६.४० टक्के गुणांसह तृतीय, गौरी शैलेश गुणदेकर ९६.२० टक्के गुणांसह चौथी आणि ज्ञानेश्वरी शंकर नरुटे हिने ९६ टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक मिळवला.

निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे ६६ पैकी तब्बल २९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले असून आणखी २९ विद्यार्थ्यांनी ७५ ते ९० टक्के या श्रेणीत गुण मिळवत विशेष प्राविण्य मिळवले आहे. तसेच ५८ विद्यार्थी विशेष योग्यता श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मराठी विषयात २४ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली, तर आय.टी. विषयात ५ विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर गुण मिळवले.
विषयवार गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयात गौरी शैलेश गुणदेकर, ज्ञानेश्वरी शंकर नरुटे आणि मानस महेंद्र आंब्रे यांनी ९९ गुण मिळवत अव्वल स्थान मिळवले. मराठी विषयात अनेक विद्यार्थ्यांनी शंभर गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली. गणित विषयात आराध्य आपटे आणि आर्यन कदम यांनी ९५ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, तर विज्ञान विषयात आर्यन कदम याने ९६ गुणांसह अव्वल स्थान मिळवले. समाजशास्त्र विषयात श्रेया विजय मोरे हिने ९८ गुण मिळवत प्रथम स्थान मिळवले. आय.टी. विषयात आराध्य आपटे, आर्यन कदम, गौरी गुणदेकर, समृद्धी घाडगे आणि भूमी केळसकर यांनी १०० गुण मिळवत विशेष यश संपादन केले.
या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे सल्लागार श्रीरंग बापट, प्राचार्य भरत मोरे, वर्गशिक्षक प्रियसी दळवी तसेच मनोज सुतार, मंदार भोसले, महेश चिले, किरण दरेकर, सिद्धी सावर्डेकर, अविनाश चौगुले आणि आशिष देशमाने यांनी मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त दीपक लढ्ढा, पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे तसेच संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे आणि सल्लागार मंडळ सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच बस चालक व मालकांनीही विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले आहे.