राजापुरात वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी; वीज वाहिनी खंडित झाल्याने संपूर्ण तालुका अंधारात

राजापूर (प्रतिनिधी):
राजापूर शहरासह संपूर्ण तालुक्याला शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार अवकाळी पावसाने झोडपून काढले. गेल्या काही दिवसांपासून तापमानात कमालीची वाढ झाल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले होते, मात्र या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असला तरी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या या जोरदार पावसामुळे तालुक्याचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून संपूर्ण तालुका अंधारात बुडाला आहे.
या अवकाळी पावसाचा मोठा फटका महावितरणच्या यंत्रणेला बसला आहे. खारेपाटण आणि ओणी येथून येणारी ३३ केव्ही मुख्य वीज वाहिनी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. या मुख्य वाहिनीचा पुरवठा खंडित झाल्याने राजापूर शहरासह ग्रामीण भागातील वीज गायब झाली. गुरुवारी तालुक्याच्या पूर्व भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या होत्या, मात्र शुक्रवारी पावसाचा जोर अधिक होता. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या वीज वाहिन्यांवर पडल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, रात्री उशिरापर्यंत वीज कर्मचारी पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील होते. अचानक आलेल्या या संकटामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.