‘सकल हिंदू समाजा’च्या वतीने भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन
आंबोली: हिंदू समाजाचे संघटन, संस्कृती संवर्धन आणि ऐक्याचे दर्शन घडवण्यासाठी आंबोली, चौकुळ आणि गेळे या तीनही गावांतील ‘सकल हिंदू समाजा’च्या वतीने आंबोली येथे एका भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे कोणत्याही राजकीय पक्षाचे किंवा विशिष्ट संघटनेचे नसून, संपूर्ण हिंदू समाजाने एकत्र येऊन आयोजित केलेले हे एक भव्य व्यासपीठ आहे.
*भव्य शोभायात्रा आणि रथांचे आकर्षण*
कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ४ वाजता भव्य शोभायात्रेने होईल. बाजारवाडी येथील श्रीराम मंदिर येथून ही यात्रा निघणार असून तिचा समारोप श्रीदेवी माऊली मंदिर येथे होईल. या शोभायात्रेत प्रभू श्री रामचंद्र यांचा रथ, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारत मातेच्या प्रतिमा असलेले रथ, तसेच ढोल-ताशा पथके आणि भगवे ध्वज हिंदू संस्कृतीचे वैभव सादर करतील. परिसरातील हजारो हिंदू बांधव आणि भगिनी पारंपरिक वेशभूषेत या यात्रेत सहकुटुंब सहभागी होणार आहेत.
सायंकाळी ६ वाजता श्रीदेवी माऊली मंदिर परिसरात मुख्य संमेलनाला प्रारंभ होईल. या सोहळ्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून भोसरी विधानसभेचे आमदार मा. श्री. महेश दादा लांडगे उपस्थित राहणार आहेत. आपल्या प्रखर आणि ज्वलंत हिंदुत्ववादी विचारांसाठी ते ओळखले जातात. त्यांच्यासोबतच मालवण येथील डॉ. पंकजजी दिघे हे ‘हिंदू धर्म, संस्कृती संवर्धन व पंच परिवर्तन’ या विषयावर मार्गदर्शन करतील. तसेच आंबोलीची सुकन्या ह.भ.प. सायलीताई महाराज गावडे यांचेही विशेष व्याख्यान या प्रसंगी आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनाचे आयोजन करताना ‘सकल हिंदू समाज’ ही भावना केंद्रस्थानी ठेवण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तीने आपला पक्ष, पद, संघटना किंवा प्रतिष्ठा मध्ये न आणता केवळ एक ‘हिंदू’ म्हणून एकत्र यावे, असा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे. संमेलनाचे गांभीर्य आणि पावित्र्य राखून संपूर्ण नियोजन करण्यात आले असून, कार्यक्रमानंतर उपस्थित सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
आंबोली, गेळे, चौकुळ आणि पंचक्रोशीतील तमाम हिंदू बांधवांनी या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी व्हावे. दुपारी ३:३० वाजता श्रीराम मंदिर येथे शोभायात्रेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन सकल हिंदू समाज समितीच्या वतीने करण्यात आले आहे.












