भाड्यासाठी गाडी घेऊन गेला आणि परत आलाच नाही

मालकाची चालकाविरुद्ध पोलिसांकडे तक्रार

रत्नागिरी ः प्रतिनिधी
भाड्यासाठी गाडी घेऊन गेलेला चालक परत आलाच नाही. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तन्मय चंद्रकात पाटील उर्फ गंगावणे (रा. चाफवली, ता. संगमेश्वर, रत्नागिरी ) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना 28 एप्रिल 2026 दुपारी दोनच्या सुमारास तालुक्यातील वळके-धनगरवाडी येथे घडली आहे.
फिर्यादी संदिप एकनाथ चव्हाण ( 43, रा. प्रभानवल्ली, खैरवाडी, ता. लांजा, रत्नागिरी) यांच्याकडे संशयित तन्मय पाटील-गंगावणे हा चालक म्हणून कामाला होता. 26 एप्रिलला कार ( एमएच -08- बीई-0466) ही गाडी भाड्याकरिता घेऊन गेला तो परत आला नाही. त्याचा शोध घेतला असता संशयित 28 एप्रिलला दुपारी 2 वा.च्या सुमारास वळके-धनगरवाडी येथे असल्याचे समजले. तेथे जावून पाहिले असता तिथूनही तो निघून गेला होता. या प्रकरणी संदिप चव्हाण यांनी संशयिताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी कारसह पलायन करणाऱ्या संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.