आंबा-काजू नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन..

वेंगुर्ले : दाजी नाईक 

सन २०२५/२६ चे आंबा व काजू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासन स्तरावर पंचनाम्याचे काम सुरू आहे. ते जलदगतीने पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने नुकसान भरपाई देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे ही नुकसान भरपाई तत्काळ देण्यात यावी, कारण शेतकऱ्यांना पीक कर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० जून असल्याने त्यांच्यासमोर आर्थिक अडचणी निर्माण असल्याचे लेखी निवेदन छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने आज वेंगुर्ले कृषी कार्यालया मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

शासनाच्या NDRF व SDRF निकषांनुसार नुकसान भरपाई मिळाल्यास पीक कर्जधारक शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. मात्र भरपाई मिळण्यात होणारा विलंब आणि सध्याची बिकट परिस्थिती यामुळे बागायतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आंबा व काजू पिकांच्या नुकसानीमुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून पीक विम्याची भरपाईही सर्वांना मिळणार नसल्याची स्थिती आहे.

शेतकऱ्यांच्या मते, पीक विम्याच्या निकषांनुसार मिळणारी भरपाई मर्यादित स्वरूपाची असते. त्याउलट शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई वेळेत प्राप्त झाल्यास ३० जूनपूर्वी पीक कर्जाची परतफेड करणे शक्य होईल. अन्यथा अनेक शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागणार असून बँकांकडून दंडात्मक व्याज आकारले जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

त्यामुळे चालू वर्षातील आंबा-काजू नुकसानग्रस्तांचा विचार करून शासनाने सरसकट नुकसान भरपाई लवकरात लवकर वितरित करावी, अशी मागणी शेतकरी व बागायतदारांकडून करण्यात आली आहे. भरपाई वितरणात विलंब झाल्यास शेतकरी आर्थिक संकटात सापडतील, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत संबंधित विभागाने तातडीने निर्णय घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी, बागायतदार तसेच छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. आज निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष शामसुंदर राय यांच्या सह शेतकरी मेघ:शाम भगत, महादेव गावडे, किशोर परब, प्रकाश वारंग, संदीप देसाई, महेश चव्हाण आदी उपस्थित होते.