विद्यार्थी हसले की देव हसतो! मालगुंडच्या श्री दुबळेश्वर महादेव मंदिर देवस्थानतर्फे शालेय साहित्याचे वाटप

१२०० विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

रत्नागिरी : मंदिर ही केवळ पूजेची जागा नसून ती समाजउभारणीची आणि सेवेची पवित्र भूमी आहे, हाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून मालगुंड येथील स्वयंभु श्री दुबळेश्वर महादेव मंदिर देवस्थानने एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. आगामी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला, परिसरातील जिल्हा परिषदेच्या १३ शाळांमधील तब्बल १२०० गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
या सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमाची सुरुवात सोमवार, दिनांक १५ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता ‘मालगुंड तळेपाठ नंबर १’ या शाळेपासून होणार असून, त्यानंतर सर्व शाळांमध्ये जाऊन साहित्याचे वाटप केले जाईल.

“शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी समाजाने व मंदिरांनी पुढे येणे गरजेचे आहे. जेव्हा एखाद्या गरजू विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलते, तेव्हाच भगवान दुबळेश्वर महादेवांचे खरे पूजन होते,” अशी भावना देवस्थान ट्रस्टतर्फे व्यक्त करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना केवळ वह्या न देता त्यांच्या दैनंदिन गरजेच्या सर्व वस्तू या संचात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने पुढील वस्तूंचा समावेश आहे. त्यामध्ये ६ गुणवत्तापूर्ण वह्या, आकर्षक स्कूल बॅग, पावसाळ्यासाठी छत्री, पाण्याची वॉटर बॅग, पेन्सिल बॉक्स, लहानग्यांच्या आनंदासाठी फ्रुटी व चॉकलेट्स आणि इतर उपयुक्त वस्तू देण्यात येणार आहे.

हा उपक्रम म्हणजे केवळ वस्तूंचे वाटप नसून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याचा आणि त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. या पवित्र आणि सामाजिक कार्यात परिसरातील माता-पिता, शिक्षक, गणमान्य नागरिक व सामाजिक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बालमित्रांना प्रोत्साहित करावे, असे आग्रहाचे निमंत्रण स्वयंभु श्री दुबळेश्वर महादेव मंदिर देवस्थान, मालगुंड यांच्या वतीने देण्यात आले आहे.