दापोली-खेड-मंडणगड मतदारसंघातील शिवसेना-युवासेना कार्यकारिणी बैठक उत्साहात; ४५ कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

खेड (प्रतिनिधी) : दापोली-खेड-मंडणगड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना व युवासेनेची महत्त्वपूर्ण कार्यकारिणी बैठक मुंबईतील दादर येथील राजश्री शाहू सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. संघटनात्मक बळकटीकरण, आगामी राजकीय नियोजन तसेच निवडणूक आयोगाच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत मतदारसंघातील विविध भागांतून आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी तब्बल ४५ प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत पक्षात अधिकृत प्रवेश केला. नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना शिवसेना नेतृत्वाने त्यांच्या माध्यमातून पक्षाची संघटनात्मक ताकद आणखी वाढणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
बैठकीदरम्यान निवडणूक आयोगाच्या SIR अभियानावर विशेष भर देण्यात आला. मतदार यादीतील दुबार नावे, मृत व्यक्तींची नावे तसेच अन्य त्रुटी दूर करून मतदार यादी अधिक अचूक आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांच्याशी समन्वय साधून प्रभावी मॅपिंग करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यातील पदाधिकारी व शाखाप्रमुखांना आगामी काळासाठी विशेष कृती आराखडा देण्यात आला. संघटन वाढ, नव्या कार्यकर्त्यांना संधी, गावागावांत पक्षाची भूमिका पोहोचविणे आणि मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवणे यावर भर देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
शिवसेना ही कार्यकर्त्यांना संधी देणारी आणि त्यांच्या योगदानाची दखल घेणारी संघटना असल्याचे सांगत मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पक्षविस्तारासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन उपस्थितांना करण्यात आले. पक्षप्रवेश अभियान आणि SIR मोहिमेच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
दादर येथील राजश्री शाहू सभागृहात झालेली ही बैठक आगामी राजकीय घडामोडी आणि संघटनात्मक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरल्याचे उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगितले.