बिजघर नं. १ शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात; माजी सैनिकांचा सन्मान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

खेड (प्रतिनिधी) : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त बिजघर नं. १ शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करून स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीने झाली. त्यानंतर माजी सुभेदार शांताराम घडशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर आयोजित बालसभेच्या अध्यक्षस्थानी प्रकाशराव नारायणराव भोसले होते, तर उपाध्यक्ष म्हणून सुनील किशोर भोसले उपस्थित होते. यावेळी माजी कॅप्टन राजाराम हरबाराव भोसले, बिजघर प्रशासक शुभांगी भोसले, निवृत्त नेव्ही अधिकारी राजेंद्र भोसले, मानकरी सुनीलराव भोसले, पोलीस पाटील प्राची मर्चंडे, वॉटर डिस्पेन्सर देणगीदार रमेश सावंत, सुनील किशोर भोसले, केशव श्रीपतराव भोसले, वसंत नरसिंगराव भोसले, भगवान भिवाजीराव भोसले, विश्वास बापूराव राणे, सुभद्रा पांडुरंग भोसले, द्रौपदी यशवंत भोसले, सुजाता रामचंद्र भोसले, सचिन राजारामराव भोसले, समीर किशोर भोसले, व्यवस्थापन समिती अध्यक्ष भगवान जंगम, राजेंद्र भोसले, संजय भोसले, अनंतराव भोसले, आकांक्षा जंगम, राजश्री भोसले, कीर्ती मोहिते, मंगेश मर्चंडे, शरद मर्चंडे, विकास मोहिते, सुधीर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात माजी सैनिकांचा विशेष सत्कार करण्यात आला. माजी सैनिकांना देण्यात आलेली सन्मानचिन्हे स्वर्गीय नारायणराव आबाजीराव भोसले यांच्या स्मरणार्थ निर्मलाताई नारायणराव भोसले यांच्या वतीने आणि प्रकाशराव नारायणराव भोसले यांच्या सौजन्याने देण्यात आली. या उपक्रमातून देशसेवेसाठी योगदान देणाऱ्या माजी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

यावेळी सावंत परिवाराच्या वतीने शाळेला देण्यात आलेल्या वॉटर डिस्पेन्सरचे उद्घाटन करण्यात आले. उमेश सावंत यांनी आपल्या भगिनी स्वर्गीय नयना रवींद्र जाधव, माहेरचे नाव नयना रमेश सावंत, यांच्या स्मरणार्थ हा वॉटर डिस्पेन्सर शाळेला भेट दिला.

तसेच हनुमान प्रतिष्ठान, बिजघर-मावळतवाडी यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. हनुमान मंदिर मंडळ, तिसंगी-आपटाकोंड यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना मोठा लाभ झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शैलेश पराडकर यांनी केले, तर संदीप घाणेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर, शैलेश पराडकर, विजय सकपाळ आणि संदीप घाणेकर यांनी विशेष प्रयत्न केले.