सुमारे ८६३ विद्यार्थ्यांनी केला शिक्षणाचा श्री गणेशा
राजापूर (वार्ताहर): शाळा प्रवेशाच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधुन राजापूर तालुक्यातील विविध प्राथमिक शाळांत सुमारे ८६३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेत आपल्या शिक्षणाचा श्री गणेशा केला. यावेळी विविध शाळांत नवागत विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत दिंडी काढून स्वागत करण्यात आले. तर शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना मोफत पाठयपुस्तके व गणवेशाचे वाटप करण्यात आले. उन्हाळयाच्या दिर्घ सुट्टीनंतर मुलांच्या किलबिलाटाने शाळा गजबजून गेल्या आहेत.
तालुक्यातील ३२३ जिल्हा परिषद शाळा व ५२ माध्यमिक शाळांत पाठयपुस्तक वाटप करण्यात आले तर शाळास्तरावर गणवेश वाटप करण्यात आल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले यांनी दिली.
शहरातील जि. प. विश्वनाथ विद्यालय शाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गात 32 तर इ. दुसरी ते सातवीच्या वर्गात 33 अशा 65 मुलानी प्रवेश घेतला. त्यांचे शाळा ते जवाहरचौक अशी स्वागत दिंडी काढण्यात आली. तर शाळेत मान्यवरांच्या उपस्थित स्वागतोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती अभिजित गुरव, गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले, नगरसेवक सुयोगा जठार, दिलीप चव्हाण, उर्मिला बाकाळकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदिप चव्हाण, उपाध्यक्षा श्वेता भिडे, मुख्याध्यापिका रूपाली नलवडे यांसह व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षकवृंद, पालक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मुलांना गणवेश व पाठयपुस्तकांचे वितरण करण्यात आले. तर उपसभापती श्री. गुरव यांनी पहिलीतील नवागत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. गटशिक्षणाधिकारी भोसले यांनी शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेबद्दल गौरवोद्गार काढले. आभार श्रीमती नांदवडेकर यांनी मानले.
तसेच जि. प. गोखले कन्याशाळा येथे इयत्ता पहिलीत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आलेल्या स्वागत दिंडीने उत्फुर्त स्वागत करण्यात आले. तर गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे यांच्या उपस्थितीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी, पालक व शिक्षकवृंद उपस्थित होता.












