तळवणेत देवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सवाचा भक्तिमय जागर

११ ते २० ऑक्टोबरदरम्यान धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन;

तळवणे | प्रतिनिधी : तनया रेडकर

तळवणे येथील श्री देवी माऊली नवरात्रोत्सव मंडळातर्फे यंदा नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ११ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या उत्सवात देवीची चरणी अभिषेक सेवा, नामांकित भजन मंडळांची भजने, दशावतार नाट्यप्रयोग, कीर्तन, कळवी नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाप्रसाद अशा विविध उपक्रमांची मेजवानी भाविकांना अनुभवता येणार आहे.

नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी, रविवार ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत श्री देवी माऊली चरणी अभिषेक सेवा होणार आहे. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता नामांकित भुवांच्या भजनांचा कार्यक्रम होईल. यामध्ये गुरुकृपा भजन मंडळ, न्हावेली, श्री देवी भवानी प्रासादिक भजन मंडळ, वेर्लेवाडी, रक्षाधारा भजन मंडळ, सातेली आणि श्री देव ईश्वरी प्रासादिक भजन मंडळ, सावंतवाडा-मातोंड या मंडळांचा सहभाग असेल. सोमवार १२ ऑक्टोबर रोजी सकाळी देवीची अभिषेक सेवा आणि सद्गुरू प्रासादिक भजन मंडळ, अणसूर यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री ९ वाजता श्री मोरेश्वर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर होईल.

मंगळवार १३ ऑक्टोबर रोजी सकाळी अभिषेक सेवा, दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद आणि रात्री ८ वाजता श्री देव आजोबा युवा फुगडी मंडळ, केरी यांचा फुगडीचा कार्यक्रम होणार आहे. रात्री ९ वाजता तालुकास्तरीय फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत श्री देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ, कुडाळ तसेच श्री गावडादेवी फुगडी ग्रुप, नेरूर यांच्यासह अन्य मंडळांचा सहभाग असेल. बुधवार १४ ऑक्टोबर रोजी श्री देवी माऊली चरणी अभिषेक सेवेनंतर रात्री ९ वाजता जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ, आरोस यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. गुरुवार १५ ऑक्टोबर रोजी अभिषेक सेवेसोबत सकाळी ९.३० वाजता भाटलेवाडी बॉईज प्रस्तुत तालुकास्तरीय नामांकित ग्रुप डांडिया नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

शुक्रवार १६ ऑक्टोबर रोजी सकाळी देवीची अभिषेक सेवा, रात्री ८ वाजता तेंडुलकर गोरे पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, कवठी यांचा नाट्यप्रयोग होईल. शनिवार १७ ऑक्टोबर रोजी अभिषेक सेवेनंतर सायंकाळी ७ वाजता सामुदायिक आरती आणि रात्री ७.३० वाजता लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. रविवार १८ ऑक्टोबर रोजी सकाळी अभिषेक सेवा, रात्री ८ वाजता सत्कार्य भजनाचा कार्यक्रम आणि त्यानंतर रात्री ९ वाजता श्री. दत्तगुरू दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.

सोमवार १९ ऑक्टोबर रोजी कीर्तनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कीर्तनकार ह.भ.प. श्री. हरिहर नातूबुवा, पुणे यांचे कीर्तन होणार असून, त्यांना नंदन परांजपे, दिलीप पेढणेकर, अंकित घातये आणि प्रवीण बर्वे यांची साथ लाभणार आहे. मंगळवार २० ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता आरती, महाप्रसाद व तीर्थप्रसाद आणि सायंकाळी ७ वाजता वारकरी भजनाचा कार्यक्रम होईल. रात्री १० वाजता हेरंब दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. नवरात्रोत्सवाच्या कालावधीत दररोज सकाळी देवीची अभिषेक सेवा आयोजित करण्यात आली आहे. तसेच दररोज सायंकाळी ७ वाजता सामुदायिक आरती होणार आहे. या उत्सवात भाविकांनी, रसिक प्रेक्षकांनी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी माऊली नवरात्रोत्सव मंडळ, तळवणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.