अट शिथिल करण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांची महसूलमंत्र्यांकडे धाव
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील आंबोली, गेळे आणि चौकुळ या गावांमधील शेतकऱ्यांना ‘शेतकरी कर्जमुक्त योजना २०२६’ चा लाभ मिळवून देण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी मुंबईत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. येथील शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती मांडत कर्जमाफीच्या लाभासाठी अनिवार्य असलेली ‘फार्मर आयडी’ची अट शिथिल करावी, अशी आग्रही मागणी केसरकर यांनी यावेळी केली. यावर महसूल मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच विशेष बैठक आयोजित करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
या संदर्भातील सविस्तर वृत्त असे की, आंबोली, गेळे व चौकुळ या गावांमधील शेतकरी गेली कित्येक वर्षे ‘कबूलायतदार गावकर’ जमिनीवर (जी जमीन नंतर महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत आली) पारंपारिक पद्धतीने शेती करत आहेत. मात्र, तांत्रिक कारणांमुळे या जमिनी अद्याप शेतकऱ्यांच्या नावे झालेल्या नाहीत व त्यांच्याकडे स्वतःचा सातबारा उपलब्ध नाही. सद्यस्थितीत ही जमीन शेतकऱ्यांच्या नावे करण्याची प्रक्रिया शासनामार्फत सुरू असली, तरी ती अद्याप पूर्ण झालेली नाही.
सातबारा नसतानाही गेली कित्येक वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून विविध कार्यकारी सोसायट्यांनी येथील शेतकऱ्यांना पीक कर्जे दिली आहेत. मात्र, शासनाने २०२६ च्या कर्जमुक्ती योजनेसाठी ‘फार्मर आयडी’ बंधनकारक केला आहे. शेतकऱ्यांच्या नावे सातबारा नसल्यामुळे त्यांना हा फार्मर आयडी मिळणे सध्याच्या स्थितीत अशक्य झाले आहे.
आ. दीपक केसरकर यांनी महसूल मंत्र्यांचे लक्ष वेधले की, गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील शेतकरी पूर्णपणे कोलमडला असून तो आर्थिक डबघाईला आला आहे. अशा परिस्थितीत शासकीय नियमांमुळे या तिन्ही गावांतील सुमारे ९० टक्के शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरणार असून ते या योजनेपासून वंचित राहतील. त्यामुळे या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
या गंभीर समस्येवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ सकारात्मक पावले उचलण्याचे सुचित केले असून, यावर मंत्रालयात लवकरच एक विशेष बैठक बोलावून निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर देखील उपस्थित होते. आता शासनाच्या पुढील भूमिकेकडे सावंतवाडीतील शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.











