वैभववाडी प्रतिनिधी :
खाजगी आराम बसमधून गोवा बनावटीची सुमारे ३६ हजार रुपये किंमतीची दारू वैभववाडी पोलीसांनी जप्त केली आहे. ही कारवाई सोमवारी मध्यरात्री २. ४० वा च्या दरम्यान करुळ चेकनाक्यावर करण्यात आली आहे. पोलिसांनी बसचा क्लिनर सचिन बाबासाहेब इरकर वय २३ रा. कात्रज पुणे याच्यावर अवैद्य दारू वाहतूक प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. तरेळे – कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गांवरील करुळ नाका येथे ड्युटीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल संदीप राठोड, हरीश जायभाय हे नेहमीप्रमाणे गाड्याची तपासणी करीत होते. मध्यरात्री गोव्याहून कोल्हापूरकडे जाणारी खाजगी ट्रॅव्हल्स पोलिसांनी तपासणीसाठी थांबवली. बसचा चालक दत्तात्रय गुलाब इलापे, अमोल सुभाष कोंढाळकर व क्लीनर सचिन बाबासाहेब इरकर असे होते. ट्रॅव्हल्सची तपासणी करत असताना क्लीनर याला गाडीची डिक्की खोलण्यास सांगितली, असता त्याने गाडीच्या डीक्या खोलून दाखवल्या परंतु एक डिकी लॉक असून उघडत नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांना संशय आला पोलिसांनी त्याच्याकडून डिक्की उघडी करून घेतली असता गाडीमध्ये गोवा बनावटीचे तीन बॉक्स दारू सापडून आली. याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांच्याकडे परवाना नसल्याचे आढळून आले. याबाबत वैभववाडी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांना माहिती देण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार सदर ट्रॅव्हल्स क्लिनर सचिन बाबासाहेब इरकर याला त्याच्या ताब्यातील दारूचे बॉक्ससह ट्रॅव्हल्स मधून खाली उतरवून ट्रॅव्हल्स मधील प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरता त्यांना पुढील प्रवासासाठी पाठविण्यात आले. यानंतर पोलिसांनी इरकर याला वैभववाडी पोलीस स्टेशन मध्ये आणून त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (अ )(इ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.












