चिपळूण : शहरातील पाग पॉवर हाऊस नाका परिसरात सोमवारी झालेल्या भीषण अपघातात ट्रकच्या धडकेत बुलेट एसटी बसखाली गेल्याने एक जण गंभीर जखमी झाला. या अपघातामुळे काही काळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सारस्वत बँकेचे कर्मचारी श्री. महाडिक आणि वॉचमन श्री. चव्हाण हे बुलेट दुचाकीवरून चिपळूणहून कापसाळच्या दिशेने जात होते. त्याचवेळी मुंबईहून रत्नागिरीकडे जाणारी एसटी बस (एमएच 14 बीटी 2524) पाग पॉवर हाऊस नाका परिसरातून पुढे जात होती. दरम्यान, मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (एमएच 43 सीक्यू 6142) ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ट्रकची जोरदार धडक बुलेटला बसली.
धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की बुलेट ट्रक आणि एसटी बसच्या मधोमध अडकली. बुलेटवर मागे बसलेले श्री. चव्हाण हे रस्त्यावर फेकले जाऊन एसटी बसच्या पुढील चाकाखाली सापडले. त्यामुळे त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघाताच्या ठिकाणी रक्ताचा सडा पडल्याने घटनास्थळाचे चित्र अत्यंत भयावह झाले होते. बुलेटस्वार श्री. महाडिक हे देखील या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमींना उपजिल्हा रुग्णालय, कामथे येथे उपचारासाठी दाखल केले. अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली. संतप्त नागरिकांनी ट्रकचालकाला चांगलाच धडा शिकवल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवून महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. या अपघाताची पुढील चौकशी पोलीस करत आहेत.












