जयगडमध्ये कंपनीत काम करताना शॉक लागून बिहारमधील कामगाराचा मृत्यू

रत्‍नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील जयगड येथील एका कंपनीत मोटार दुरुस्तीचे काम करताना शॉक लागलेल्या परप्रांतिय कामगाराचा मृत्‍यू झाला. ही घटना मंगळवार 16 जून रोजी दुपारी 12.45 वा.सुमारास घडली. याबाबत जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्‍यूची नोंद करण्यात आली आहे.
सुदिपकुमार सुरेश सिंग (27,रा.हिरापाकडटोला,मंगरहा मानिकपूर गोपालगंज,बिहार) असे शॉक लागून मृत्‍यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. मंगळवारी तो चौगले लावगण शिप रिपेअर प्रा.लिमिटेड या कंपनीमध्ये बर्थ नं4 वर शांतीसागर 17 या जहाजावर काम करत होता. काम करत असताना इलेक्ट्रोमेंट इंजिनिअरिंग वर्कस या कंपनीमार्फत जहाजाचे इंजिन रुममधील स्टार बोर्डच्या इंजिनवरील पंप रुममधील मोटार दुरुस्तीचे काम करताना त्‍याला शॉक लागला. शॉक लागल्याने सुदीपकुमार सिंग हा बेशूध्द पडल्योन इतर कामगारांनी त्‍याला उपचारांसाठी तातडीने रुग्णवाहिकेतून प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद-खंडाळा येथे दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सुदीपकुमारला तपासून मृत घोषित केले.