किरकोळ कारणावरून तिघांकडून एकाला मारहाण, डंपर खाली चिरडून टाकण्याची धमकी

केळंबे माळवाडी येथील घटना, तिघांवर गुन्हा दाखल

लांजा (प्रतिनिधी) जमिनीमध्ये वय घालत असताना विचारणा केली म्हणून तिघा जणांनी एकाला मारहाण, धकलाबुकल करून जखमी केले. तसेच डंपर खाली चिरडून टाकू अशी धमकी दिल्याची घटना केळंबे माळवाडी येथे घडली असून याप्रकरणी तिघा जणांवर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबतची तक्रार प्रसाद चंद्रशेखर जठार (वय ३६, व्यवसाय कॉन्ट्रॅक्टर राहणार माळवाडी केळंबे तालुका लांजा) यांनी लांजा पोलीस ठाण्यात केली आहे. दिनांक १७ जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास केळंबे माळवाडी येथे विलास जयसिंग शेलार (वय ४५), शुभम चंद्रशेखर शेलार (वय २५), ओम उर्फ घारू चंद्रशेखर शेलार (वय १९, सर्व राहणार कळंबे माळवाडी) हे तिघेजण जमिनीमध्ये वय घालत होते. यावेळी प्रसाद जठार यांनी घालत असलेल्या वयाची विचारणा केली. याचा राग येऊन विलास शेलार याने त्याने अंगावर धावून जात त्यांची मान पकडली. तर शुभम शेलार याने प्रसाद जठार यांच्या हातातील मोबाईल घेण्याकरता त्यांचा हात पिरगळून धकलाबुकल केली. तसेच या तिघांनी प्रसाद जठार यांच्या कमरेवर, डोक्यात व पाठीवर खताचे झाडाचा ठोंबा मारून दुखापत करून जखमी केले. त्याचप्रमाणे विलास शेलार यांनी प्रसाद जठार यांना वयच्या गेटच्या बाहेर काढून तू यापूर्वी वाचला आहेस यापुढे तुला डंपर खाली चिरडून टाकू अशी धमकी दिली.
या मारहाण प्रकरणी प्रसाद जठार यांनी केलेल्या तक्रारीनुसार लांजा पोलिसांनी विलास शेलार, शुभम शेलार आणि ओम शेलार या तिघां विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), १३१, ३(५), प्रमाणे तसेच भादविक ३२४, ३२३, ५०६, ३५२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल आर एन नावळेकर या करीत आहेत.