भिवंडी : नाशिक-मुंबई महामार्गावरील आर. सी. पाटील पुलावर ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला. दुचाकी आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीवरील मागे बसलेल्या महिलेचा ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भिवंडीकडून ठाण्याकडे जात असताना हा अपघात घडला. धडकेनंतर महिला रस्त्यावर पडली आणि ट्रकच्या चाकाखाली आल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भिवंडीहून ठाण्याकडे जात असताना अपघातस्थळाजवळून जात होते. त्यांनी तात्काळ वाहन थांबवून घटनास्थळी पाहणी केली आणि जखमींना त्वरित वैद्यकीय मदत मिळावी यासाठी ॲम्बुलन्स बोलावण्याच्या सूचना दिल्या.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.












