निकाल १०० टक्के; फाईन आर्ट (पेंटिंग) द्वितीय व चतुर्थ वर्षात दैदिप्यमान यश; कु. अलमा सोलकर विद्यापीठात प्रथम
देवरूख (प्रतिनिधी):
देवरूख येथील नामांकित डिकॅड कॉलेज ऑफ फाईन आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. मुंबई विद्यापीठाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या फाईन आर्ट (पेंटिंग) विभागाच्या द्वितीय आणि चतुर्थ वर्षाचा निकाल १०० टक्के लागला असून, गुणवत्ता यादीत डिकॅडच्या विद्यार्थ्यांनीच वर्चस्व गाजवले आहे.
या परीक्षेत कॉलेजची विद्यार्थिनी कु. अलमा मि. सोलकर हिने मुंबई विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांक पटकावण्याचा बहुमान मिळवला आहे. डिकॅड कॉलेजच्या तब्बल पाच विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या टॉप ५ मध्ये स्थान मिळवून संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे. यामध्ये कु. अलमा मि. सोलकर- मुंबई विद्यापीठात प्रथम, यश पवार-मुंबई विद्यापीठात दुसरा क्रमांक, देवाषीश पवार- मुंबई विद्यापीठात चौथा क्रमांक, धनंजय पांचाळ-मुंबई विद्यापीठात पाचवा क्रमांक, मृणाल पंडित-मुंबई विद्यापीठात पाचवी (महिला वर्ग/सामान्य) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. संस्थाचालक व प्राचार्यांकडून कौतुकाचा वर्षाव विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या अभूतपूर्व यशामुळे संपूर्ण देवरुख परिसरात आनंदाचे वातावरण आहे. या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अजय पित्रे, श्रीमती भारती पित्रे आणि डिकॅड कॉलेजचे प्राचार्य रणजित मराठे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांचे मनापासून अभिनंदन केले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
चौकट
डिकॅड कॉलेजने नेहमीच कलेच्या क्षेत्रात गुणवत्तेला प्राधान्य दिले आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेला १००% निकाल आणि विद्यापीठातील अव्वल क्रमांक हा त्यांच्या कष्टाचा आणि कॉलेजच्या दर्जेदार शिक्षणाचा परिपाक आहे.
रणजित मराठे, प्राचार्य, डिकॅड, देवरूख











